खंडित वीजपुरवठ्याने मनमाडकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:45 IST2021-05-18T21:01:56+5:302021-05-19T00:45:08+5:30
मनमाड : गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील सर्व सामान्य वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे त्रस्त झाले असून, दिवसभरातून अनेक वेळेला वीजपुरवठा खंडीत होत असतो. या बाबत शहर भाजपाने आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालय प्रमुख अधिक्षक अभियंता एस.ए तडवी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

मनमाड येथे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नितीन पांडे, जयकुमार फुलवानी, एकनाथ बोडके, नितीन आहेरराव, मकरंद कुलकर्णी, अकबर शहा, जलील अन्सारी आदी.
मनमाड : गेल्या दोन महिन्यांपासून शहरातील सर्व सामान्य वीज ग्राहक वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार व निष्काळजीपणामुळे त्रस्त झाले असून, दिवसभरातून अनेक वेळेला वीजपुरवठा खंडीत होत असतो. या बाबत शहर भाजपाने आक्रमक भूमिका घेत विभागीय कार्यालय प्रमुख अधिक्षक अभियंता एस.ए तडवी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
वीज वितरण कंपनीच्या बेजबाबदार कारभाराचा पाढा यावेळी वरिष्ठांपुढे वाचण्यात आला. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून वीज जाण्याचे प्रमाण अत्यंत वाढले आहे. दिवसातून अनेक वेळेला वीज प्रवाह खंडित होत असतो. याविषयीची कोणतीही पूर्वसूचना ग्राहकांना दिली जात नाही. वीज पुरवठा खंडित झाल्याने मनमाड शहराच्या पाणी वितरणाचे नियोजन कोलमडून पडत आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जी पणामुळे पाणीपुरवठा उशिरा झाल्याने नागरिकांना मोठ्या मनस्तापास सामोरे जावे लागत आहे. मनमाड शहरातील वीज वितरण कंपनीच्या कारभाराची दुरवस्था त्वरित सुधारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष नितीन पांडे, शहराध्यक्ष जयकुमार फुलवानी, सरचिटणीस एकनाथ बोडके, नितीन आहेरराव, मकरंद कुलकर्णी, अकबर शहा, जलील अन्सारी, बुढन शेख, प्रमोद जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.