माणिकराव कोकाटे यांना तुर्तास दिलासा, शिक्षेला स्थगिती
By अझहर शेख | Updated: March 5, 2025 14:36 IST2025-03-05T14:33:43+5:302025-03-05T14:36:53+5:30
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु विजय कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे.

माणिकराव कोकाटे यांना तुर्तास दिलासा, शिक्षेला स्थगिती
नाशिक : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधु विजय कोकाटे यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने तुर्तास दिलासा दिला आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी २० फेब्रुवारी रोजी सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन जीवने यांनी बुधवारी (दि.५) स्थगिती दिली. यामुळे कोकाटे यांच्या मंत्रीपदासह विधानसभा सदस्यत्वपदाला निर्माण झालेला धोका टळला आहे. जोपर्यंत जिल्हा न्यायालयात अपिलाची अंतीम सुनावणी पुर्ण होत नाही, तोपर्यंत स्थगिती कायम राहणार आहे.
मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार योजनेच्या दहा टक्के राखीव कोट्यातून नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नरसारख्या मोक्याच्या ठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये बनावट कागदपत्रांच्याअधारे फसवणूक करून चार सदनिका हडपल्याच्या आरोपाखाली कोकाटे बंधूंविरूद्ध खटला सुरू होता. या खटल्यात अंतिम सुनावणी होऊन नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी आर.सी.नरवाडीया यांच्या कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. यामध्ये कोकाटे बंधूंना दोषी धरण्यात आले होते. प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने कोकाटे यांचा जामीन मंजूर केला होता. या निकालाविरूद्ध कोकाटे यांच्याकडून जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. या अपिलावर झालेल्या पहिल्या सुनावणीत शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाली होती. बुधवारी दोन वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेलाही जिल्हा न्यायालयाने अपील सुरू असेपर्यंत स्थगिती दिली आहे.
कोकाटे यांच्या वतीने युक्तीवाद असा...
कनिष्ठ न्यायालयाने ज्या मुद्द्यांच्याअधारे शिक्षा सुनावली आहे. ते मुद्दे योग्य नाही, आम्हाला अपिलामध्ये यश येईल, याची खात्री वाटते, असा युक्तीवाद कोकाटे बंधूंच्या वतीने यावेळी ॲड. अविनाश भिडे यांनी केला. न्यायालयाने युक्तीवाद ग्राह्य धरत अपील सुरू असेपर्यंत शिक्षेला स्थगिती दिली.