एकाच वेळी दोघींच्या गळ्यातील हिसकावले मंगळसूत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:14 IST2021-03-16T04:14:55+5:302021-03-16T04:14:55+5:30
पवननगर येथील जलकुंभाजवळून फिर्यादी सरिता राजेंद्र बडगुजर (५२, रा.हरिओम कॉलनी) या त्यांच्या ओळखीच्या पल्लवी कुलकर्णी यांच्यासोबत बोलत पायी जात ...

एकाच वेळी दोघींच्या गळ्यातील हिसकावले मंगळसूत्र
पवननगर येथील जलकुंभाजवळून फिर्यादी सरिता राजेंद्र बडगुजर (५२, रा.हरिओम कॉलनी) या त्यांच्या ओळखीच्या पल्लवी कुलकर्णी यांच्यासोबत बोलत पायी जात होत्या. रविवारी (दि.१४) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास काळ्या रंगाच्या दुचाकीने भरधाव आलेल्या चोरट्याने या महिलांजवळ येऊन दुचाकी हळू करत, दोघींच्या मानेवर हाताची थाप मारून एकाच वेळी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. बडगुजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, उशिरापर्यंत चोरटा पोलिसांच्या हाती लागला नाही. आतापर्यंत घडलेल्या साेनसाखळी चोरीच्या एकाही गुन्ह्यातील संशयित आरोपीला बेड्या ठोकण्यास पोलिसांना यश आलेले नाही. या जबरी चोरीत चोरट्यांनी बडगजर यांची १० ग्रॅम वजनाची २० हजारांची सोनसाखळी तर कुलकर्णी यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची ४० हजार रुपये किमतीची सोनसाखळी असे एकूण ६० हजार रुपयांचे दागिने ओरबाडून पलायन केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, मोहन ठाकूर, पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्यासह गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ बिनतारी संदेश यंत्रावरून परिसरात नाकाबंदी करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांना सोनसाखळी चोर गवसला नाही.