पेठ पंचायत समिती उपसभापतिपदी मंदा चौधरी
By Admin | Updated: March 23, 2016 23:27 IST2016-03-23T23:27:24+5:302016-03-23T23:27:52+5:30
पेठ पंचायत समिती उपसभापतिपदी मंदा चौधरी

पेठ पंचायत समिती उपसभापतिपदी मंदा चौधरी
पेठ : विद्यमान उपसभापती महेश टोपले यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर रिक्त झालेल्या पेठ पंचायत समितीच्या उपसभापतिपदी कॉँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या मंदा रामचंद्र चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
पेठ पंचायत समितीत चार सदस्य संख्या असून, पैकी दोन सदस्य शिवसेनेचे असल्याने पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेने मनसेचे महेश टोपले यांना उपसभापतिपद देऊन पंचायत समितीची सत्ता आपल्याकडे राखली होती़ नंतरच्या अडीच वर्षातही टोपले यांनाच उपसभापतिपद देऊन शिवसेनेच्या जयश्री वाघमारे सभापती झाल्या़ मात्र पंचवार्षिक मुदत संपण्यास जवळपास एक वर्षाचा कालावधी शिल्लक असताना शिवसेनेने काँग्रेसच्या मंदा चौधरी यांना विश्वासात घेऊन महेश टोपले यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून तो मंजूरही झाला़
बुधवारी येथील तहसीलदार कैलास कडलग, गटविकास अधिकारी बी़बी़ बहिरम यांच्या उपस्थितीत उपसभापतिपदासाठी निवड प्रक्रिया पार पडली़ या पदासाठी मंदा चौधरी यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली़ यावेळी सभापती जयश्री वाघमारे, माजी सभापती अंबादास चौरे उपस्थित होते़ या निवड प्रक्रियेत महेश टोपले गैरहजर होते़
मंदा चौधरी यांच्या निवडीनंतर शिवसेना व कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला़ शिवसेनेचे तालुकाप्रमुख भास्कर गावित, जि़प़ सदस्य हेमलता गावित, सभापती जयश्री वाघमारे, माजी सभापती अंबादास चौरे, बाजार समिती संचालक श्यामराव गावित, युवा सेनाप्रमुख मोहन कामडी, रामदास वाघेरे, तुळशिराम वाघमारे, गणेश शिरसाठ, जगदीश शिरसाठ यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या निवड प्रसंगी काँग्रेसच्या तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांनी पाठ फिरवल्याने आगामी काळात मंदा चौधरी शिवसेनेच्या वाटेवर जाणार अशी चर्चा राजकीय वर्तृळात बोलली जात आहे़(वार्ताहर)