मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!
By Admin | Updated: July 15, 2014 22:47 IST2014-07-14T21:46:42+5:302014-07-15T22:47:40+5:30
मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!

मनमाडकरांची रोटेशन सुटल्याने भागली ‘तहान’!
मनमाड : मनमाड शहरासाठी मिळणाऱ्या पालखेडच्या पाण्याच्या आवर्तनास झालेला विलंब व पावसाने मारलेली दडी यामुळे मनमाडकरांना पाणीटंचाईशी सामना करावा लागत आहे. नुकतेच आवर्तनाचे पाणी वागदर्डी धरणात येऊन पोहोचले असून, शहराच्या अनेक भागांतील नळांना तब्बल २८ ते २९ दिवसांनी पाझर फुटला असून, तृषार्त मनमाडकरांची तहान तात्पुरती तरी भागली आहे. पालखेडच्या धरणातून सोडलेले पाणी मनमाडकरांना दोन महिने पुरवावे लागणार आहे.
गेल्या वर्षीच्या जलसंकटानंतर पावसाळाही कोरडा गेला. त्यामुळे या वर्षी शहराला पाणीपुरवठा करणारे वागदर्डी धरण भरलेच नाही. परिणामी मनमाडकरांना वर्षभर आवर्तनाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागले.
मनमाडसाठी २ जुलैला पाण्याचे आवर्तन मिळणे अपेक्षित होते. मात्र लांबलेल्या पावसामुळे ते ७ जुलैला सोडण्यात आले. पाणीचोरीची शक्यता लक्षात घेता पोलीस बंदोबस्तात हे पाणी पाटोदा येथील साठवण तलावापर्यंत पोहोचले. या आवर्तनामुळे सध्याच्या व्यवस्थेत मनमाडरांना दीड महिना पाणी पुरणार असल्याचा अंदाज आहे. हे लांबलेले आवर्तन व पावसाची हुलकावणी यामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे शहराच्या अनेक भागात २८ ते २९ दिवसांनंतर नळाला पाणी आले आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या लाखभर लोकसंख्येच्या मनमाड शहराला टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या दीड महिन्यात पाण्याच्या प्रश्नावर शहरात तब्बल पाच आंदोलने झाली. मनमाडची तहानलेली जनता पाण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने शहराचा पाणीप्रश्न राज्यात चर्चेचा विषय विषय बनला होता. वरुणराजाच्या अवकृपेमुळे सर्वत्र पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, या व मात करण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने दोन कोटी ३० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये ४५ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, तर ६० बोअरवेलचा समावेश आहे. सध्या शहरात पालिकेचे ३६५ हापसपंप असून, ते पावसाअभावी कोरडे पडले आहेत. टॅँकरला मंजुरी मिळाल्यास नाग्या साक्या धरणातून पाणी आणून शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे.