मानवाचा जन्म ईश्वराची भक्ती करण्यासाठीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:57 IST2019-05-23T00:56:43+5:302019-05-23T00:57:06+5:30
अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते.

मानवाचा जन्म ईश्वराची भक्ती करण्यासाठीच
पंचवटी : अध्यात्म शुद्ध शास्त्र आहे. हे शास्त्र शिकल्याने मनुष्याच्या समस्या आपोआप सुटतात. समस्येवर मार्गदर्शन करण्यासाठी संतांकडे कधीही पैशांची गरज लागत नाही, तर तेथे फक्त भक्ती लागते. मनुष्यजन्म केवळ भक्ती करण्यासाठी मिळाल्याचे प्रतिपादन अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.
पेठरोडवरील रामशेज येथे जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठातर्फे बुधवारी (दि.२२) समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे आयोजन केले होते त्याप्रसंगी नरेंद्राचार्य यांनी उपस्थित भाविकांना आशीर्वचनपर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी पुढे असे सांगितले की, सत्कर्म करून जास्तीत जास्त पुण्य या जन्मात मिळवावे. पापसुद्धा याच जन्मात फेडावे लागते ते दु:खाच्या स्वरूपात. जीवनात दु:ख निर्माण होणार नाही यासाठी दिवसातून किमान दहा मिनिटे मन एकाग्र करा. मनात दुसरा कोणताच विचार आणू नये. मनाला भक्तीचा व्यायाम द्यावा. असे केल्याने कोणत्याही देवाची माणसाला गरज पडणार नाही, तो स्वत:च स्वत:च्या समस्येवर मात करू शकतो. जास्त अपेक्षा हेच खरे दु:खाचे कारण आहे. दु:खाचे आणखी कारण सांगताना स्वामीजी म्हणाले की, आपण दिवसभरात जे निर्णय घेतो ते फार महत्त्वाचे आहे. निर्णय बिनचूक घेतल्यास दु:ख निर्माण होत नाही. त्यासाठी संयम मात्र महत्त्वाचा आहे. समयसुचकता अंगी असल्यास समस्या निर्माण होत नाही. दानाचे महत्त्व सांगताना त्यांनी समाजोपयोगी सेवेत भाविकांनी रक्तदान, अवयवदान, अन्नदान, श्रमदान यांपैकी कोणतेही दान करावे. समाजाच्या सेवेतदेखील गुरू सेवा आहे, तसे ते शेवटी म्हणाले. यावेळी राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.