मालेगाव महापालिका २४ रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत
By Admin | Updated: December 21, 2015 23:53 IST2015-12-21T23:51:02+5:302015-12-21T23:53:28+5:30
मालेगाव महापालिका २४ रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत

मालेगाव महापालिका २४ रोजंदारी कर्मचारी कायम सेवेत
मालेगाव : मालेगाव महानगरपालिकेतील १९९३ पासून रोजंदारीने काम करणाऱ्या २४ कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या सेवेत कायम करण्यात आल्याची माहिती सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली.
तत्कालीन मालेगाव नगरपालिकेत १९९३ पूर्वी रोजंदारी तत्त्वावर १४० कर्मचारी कार्यरत होते. या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त तत्कालीन नगरपालिकेच्या चालक, गवंडी, मुकादम, शिपाई, आया, सफाई कामगार संवर्गातील रोजंदारी तत्त्वावर ३२ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नगरपालिकेने कमी केल्याने रोजंदारी कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांना कामावर रुजू करून घेण्यात आले.
सद्यस्थितीत या ३२ रोजंदारी कर्मचाऱ्यांपैकी ३० रोजंदारी कर्मचारी आजही मनपाच्या सेवेत कार्यरत आहेत. या ३० रोजंदारी कर्मचाऱ्यांपैकी २४ रोजंदारी कर्मचारी १९९३ पूर्वीचे असल्याने त्यांना मनपाच्या सेवेत सामावून घेण्यात यावे व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या सेवेप्रमाणे लाभ मिळावा यासाठी संबंधित विभागाकडे भुसे यांनी मागणी केली होती.
११ डिसेंबर २०१५ च्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णयान्वये मालेगाव मनपाच्या २४ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मनपाने कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी २४ अधिसंख्य पदे निर्माण करुन या रोजंदारी कर्मचाऱ्यांना मालेगावच्या मनपाच्या सेवेमध्ये समायोजनाने सामावून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.