मालेगावी ईद-ए-मिलाद उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:36 IST2020-10-30T21:47:50+5:302020-10-31T00:36:39+5:30
मालेगाव मध्य : प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने आॅल इंडिया सुन्नी जमियत उलमाच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पोलिस बंदोबस्तात मिरवणूक शांततेत पार पडली.

मालेगावी ईद-ए-मिलाद उत्साहात
मालेगाव मध्य : प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती निमित्ताने आॅल इंडिया सुन्नी जमियत उलमाच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात पोलिस बंदोबस्तात मिरवणूक शांततेत पार पडली. मिरवणुकीचा समारोप ए. टी. टी. हायस्कूलच्या प्रांगणावर झाला. याप्रसंगी जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी प्रमुख मौलवींचा सत्कार केला. यावेळी मौलाना अहमद रजा मिस्बाही, मुफ्ती वाजीद अली, मौलाना नसिमुल कादरी आदिंची भाषणे झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करून पैगंबर जयंती साजरी करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले होते. मात्र प्रातिनिधीक स्वरूपात मिरवणूक काढण्याची भूमिका मौलवींच्या वतीने घेण्यात आल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली होती. काल अवघ्या १० जणांना मिरवणुकीत सहभागी होण्याच्या अटीवर पोलिसांनी परवानगी दिली. त्यानुसार आज सकाळी इस्लामपुरा येथील मदरसा हनफीया सुन्नीया येथून सकाळी ९ वाजेच्या सुमारास मोजक्या मौलवींच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. मछली बाजार, कुसुंबा रस्ता, हजारखोली, नयापुरा, आझादनगर, चंदनपुरी गेट मार्गे ए. टी. टी. विद्यालयाच्या प्रांगणावर मिरवणुकीे सभेत रूपांतर झाले. मिरवणुकीस प्रथम पोलिसांनी परवानगी नाकारल्याने नागरिकांची द्विधा मनस्थिती असल्याने मुस्लिम बांधवांनी मिरवणुकीत सहभागी घेण्याचे टाळले; परंतु मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानींसह रस्ते सजविण्यात आले होते. ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले.