मालेगाव खटल्याचा निकाल: मालेगावी जल्लोष अन् सन्नाटाही...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:02 IST2025-08-01T09:02:30+5:302025-08-01T09:02:30+5:30
या भागातील व्यवहार सुरळीत चालू असले तरीही नेहमीची वर्दळ दिसून आली नाही.

मालेगाव खटल्याचा निकाल: मालेगावी जल्लोष अन् सन्नाटाही...!
लोकमत न्यूज नेटवर्क, मालेगाव (जि. नाशिक) : बॉम्बस्फोटप्रकरणी गुरुवारी विशेष न्यायालयाने निकाल देत सर्व आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करताच निकालाचे शहरात पडसाद उमटले. हिंदुत्ववादी संघटनांनी निकालाचे स्वागत करत जल्लाेष केला, तर स्फोटातील पीडितांसह काहींनी नापसंती दर्शवत न्यायाची अपेक्षा केली.
विशेष न्यायालयाने निकाल घोषित करताच शहरातील विविध हिंदू संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोसम पूल चौकातील गांधी पुतळ्यासमोर एकत्र येत जल्लाेष सुरू केला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत एकमेकांना पेढे भरविले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दुमदुमला.
फटाके फोडण्यावरून वाद
जल्लोषप्रसंगी काही कार्यकर्त्यांनी फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. त्याला पोलिसांनी प्रतिबंध केला. त्यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडल्याशिवाय परत जाणार नाही, अशी भूमिका घेतली. काही वेळ कार्यकर्ते व पोलिस यांच्यात वाद होऊन फटाक्यांची खेचाखेची झाली.
पूर्व भागात निकालाचा निषेध
न्यायालयाच्या निकालाचा शहराच्या पूर्व भागात निषेध करण्यात आला. हा निकाल आम्हाला मान्य नसून, राजकीय दडपणाखाली देण्यात आला असल्याच्या प्रतिक्रिया मुस्लीमबहुल पूर्व भागातील नागरिकांनी व्यक्त केल्या, तर काही नागरिकांनी उघड उघड भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, या भागातील व्यवहार सुरळीत चालू असले तरीही नेहमीची वर्दळ दिसून आली नाही.