मालेगाव खटला: १७ वर्षांनंतरही घड्याळाचे काटे थांबलेलेच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 09:29 IST2025-08-01T09:28:08+5:302025-08-01T09:29:02+5:30
अचानक झालेल्या स्फोटाच्या तीव्रतेने दुकानात भिंतीवर लावलेले घड्याळ बंद पडले. ती वेळ होती रात्री ९ वाजून ३५ मिनिटांची.

मालेगाव खटला: १७ वर्षांनंतरही घड्याळाचे काटे थांबलेलेच!
आशिष मांडगे, लोकमत न्यूज नेटवर्क, मालेगाव (जि. नाशिक) : शहरातील भिक्कू चौक परिसरातील नसीर डेअरीसमोर २००८ साली रमजान महिन्याच्या २८ व्या रात्री झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या स्मृती न्यायालयाच्या निकालानंतर आज पुन्हा ताज्या झाल्या. याच चौकात घडलेल्या स्फोटावेळी एजाज अहमद हे आपल्या दुकानात बसले होते. अचानक झालेल्या स्फोटाच्या तीव्रतेने त्यांच्या दुकानात भिंतीवर लावलेले घड्याळ बंद पडले. ती वेळ होती रात्री ९ वाजून ३५ मिनिटांची.
एजाज अहमद यांनी हे घड्याळ आजही आहे त्याच स्थितीत दुकानात जपून ठेवले असून, त्या भीषण घटनेचे हे घड्याळ एक मूक साक्षीदार आहेत. त्या रात्रीच्या स्फोटात दुकान मालक एजाज अहमद स्वतः गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या दुकानाच्या भिंतीत आजही स्फोटातील लोखंडी छर्रे अडकलेले आहेत. त्या घटनेची स्मृती म्हणून या खुणा जशाच्या तशा ठेवण्यात आल्या आहेत.
आम्हाला न्याय नाही मिळाला. न्यायाची अपेक्षा होती. मात्र, आमच्या पदरी निराशा आली. माझा लहान भाऊ यात जखमी झाला होता. दरवेळी त्या घड्याळाकडे पाहिले की, त्या काळजाला थरथरवणाऱ्या रात्रीची आठवण होते. १७ वर्षांनंतरही त्या थांबलेल्या घड्याळाने एक सत्य सांगितले आहे की, काळ सरला; पण वेदना थांबल्या नाहीत. - जलील अहमद मोहम्मद युनूस, एजाज अहमद यांचे भाऊ.