मालेगावी सात तास वीज गायब
By Admin | Updated: April 29, 2017 01:58 IST2017-04-29T01:58:39+5:302017-04-29T01:58:47+5:30
मालेगाव कॅम्प : ऐन अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेपासून मालेगाव शहरात सुमारे सात तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने उन्हाच्या त्रासाने शहरवासीय त्रस्त झाले होते.

मालेगावी सात तास वीज गायब
मालेगाव कॅम्प : ऐन अक्षयतृतीयेच्या दिवशी सकाळी साडेदहा वाजेपासून मालेगाव शहरात सुमारे सात तास विद्युतपुरवठा खंडित झाल्याने उन्हाच्या त्रासाने शहरवासीय त्रस्त झाले होते. भारनियमनामुळे संताप व्यक्त करण्यात आला.
अक्षयतृतीया सणाची लगबग शहरात सुरू होती. सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साही वातावरण असताना सकाळी पावर गुल झाला. थोडा वेळ वाट पाहून नागरिकांनी याबाबत चौकशी सुरू केली परंतु वीज कार्यालयाचा दूरध्वनी मृतावस्थेत झाला होता. पूर्वी शुक्रवारी भारनियमन होत होते. त्यानुसार काही वेळ भारनियमन असेल अशी प्रतिक्षा होती. परंतु सायंकाळी सहा वाजता वीजपुरवठा सुरु झाला. मोतीभवन, कॅम्प परिसर, टिळकनगर, संगमेश्वर, सोयगाव, जुने सोयगाव गावठाणसह असंख्य परिसरात सणाच्या कामाच्या वेळेत वीज नसल्याने महिलांनी संताप व्यक्त केला. अक्षय तृतीयेसाठी लागणारा पुरणपोळीचा नैवैद्य प्रसाद, स्वयंपाक करण्यात महिलांची मोठी अडचण झाली होती. अनेकांनी मोतीभवन कार्यालयावर धाव घेतली परंतु समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अनेक कर्मचाऱ्यांचे मोबाईल देखील बंद होते.
तांत्रिक बिघाड अथवा भारनियमन याबाबत कर्मचारी अनभिज्ञ होते. आम्ही देखील वरिष्ठ पातळीवर विचारणा करीत आहोत, आम्हाला जास्त माहित नाही असे वीज कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी अधिकच संताप व्यक्त केला. सध्या एप्रिल महिन्याचे तपमान ४३ ते ४५ अंश सेल्सीअस एवढे तापले आहे. वीज गुल झाल्यामुळे घामांच्या धारांनी शहरवासियांना त्रस्त केले व विद्युत कंपनीच्या नावाने अनेकांनी बोटे मोडली. त्यामुळे पूर्व सूचना दिल्यानंतर वीजपुरवठा बंद करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती. (वार्ताहर)