मालेगाव : शहरातील महाविद्यालयीन तरुणींच्या सुरक्षिततेसाठी कॅम्प पोलिसांनी सुरू केलेली हेल्पलाइन अल्पावधीत लोकप्रिय होत आहे. या हेल्पलाइनमुळे रोडरोमिओंना चांगला चाप बसला आहे. येथील कॅम्प पोलिसांनी महिलांना संकटकाळात तत्काळ मदत व्हावी या उद्देशाने पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांच्या पुढाकारातून एक हेल्पलाइन सुरू केली. अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या हस्ते या लाइनचा शुभारंभ करण्यात आला. काही महिन्यांपासून महिला व तरुणींना घरातून बाहेर पडणे अशक्य झाले होते. त्यात दागिने ओरबाडणाऱ्यांनी धुमाकूळ घातला होता. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. या विरोधात येथील कॅम्प पोलिसांत नव्याने रूजू झालेल्या राम भालसिंग यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी व पोलिसांना गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी ‘निर्भय रहा- निश्चित रहा’ हे अभियान सुरू केले. त्यात सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनसाठी ९३२६२०२०३० हा दूरभाष्य क्रमांकावर संपर्क किंवा संदेश टाकण्याचे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे या क्रमांकावर आलेले संदेश किंवा संपर्कांचे नंबर गुप्त ठेवण्यात येत आहेत. या हेल्पलाइनमुळे महाविद्यालय परिसरात होणाऱ्या छेडखानीला चांगलाच आळा बसला आहे. तरुणी व महीलांमध्ये हा क्रमांक चांगलाच लोकप्रिय होत चालला आहे. (प्रतिनिधी)
मालेगावी पोलिसांची हेल्पलाइन लोकप्रियतेच्या शिखरावर
By admin | Updated: August 23, 2015 22:23 IST