महिरावणी-शिवणगाव पूल खचला
By Admin | Updated: June 12, 2017 00:56 IST2017-06-12T00:56:12+5:302017-06-12T00:56:37+5:30
उद्घाटनापूर्वीच दुर्घटना : मुसळधार पावसाने दुर्दशा, दर्जाबाबत शंका; वाहतुकीस पूल बंद

महिरावणी-शिवणगाव पूल खचला
लोकमत न्यूज नेटवर्क
सातपूर : महिरावणी ते शिवणगाव रस्त्यावर वर्षभरापूर्वी बांधलेला पूल पहिल्याच पावसात खचल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्घाटनापूर्वीच हा पूल खचला असून, पुलाच्या दर्जाबाबत चर्चा होऊ लागली आहे.
महिरावणी-शिवणगाव पूल बांधकाम विभागाने पूर्ण केला असून, रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावरील शिवणगाव जवळ असलेला रस्ता खचला आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याने पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी या पुलावरून वाहने जाऊ नये म्हणून ग्रामस्थांनी दगड टाकून मार्ग बंद केला आहे.
वर्षभरापूर्वी बांधकाम झाल्यानंतर पहिल्याच पावसात रस्ता खचल्याने सदरच्या निकृष्ट कामाची चौकशी होऊन याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसेचे तालुका अध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी केली आहे. काही दिवसांतच शाळा सुरू होणार असल्याने तत्पूर्वी पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अनेक कामगारांना नोकरीसाठी शहरात यावे लागते. शेतकऱ्यांना भाजीपाला मार्केटमध्ये न्यावा लागतो. शहराशी जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे.याच रस्त्यासाठी झाले होते आंदोलनमहिरावणी ते गणेशगाव रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी मनसेचे तालुका अध्यक्ष रमेश खांडबहाले यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १० डिसेंबर २०१५ रोजी गणेशगाव येथील जलकुंभावर चढून अभिनव आंदोलन छेडले होते. त्यानंतर जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली होती. सुमारे ७ कोटी रु पये खर्चाच्या या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. या मार्गावरील पूलही तयार करण्यात आला. मात्र, अवघ्या वर्षभरानंतर आणि या पुलाच्या उद्घाटनापूर्वीच हा पूल खचला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले आहे.