नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे गौरी पटांगणावर महारांगोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:52 IST2018-03-17T00:52:41+5:302018-03-17T00:52:41+5:30
हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून, त्याअंतर्गत गोदाघाटावरील गौरी पटांगणावर महारांगोळी रेखाटण्यात आली.

नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे गौरी पटांगणावर महारांगोळी
नाशिक : हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचे पारंपरिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यासाठी नववर्ष स्वागतयात्रा समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून, त्याअंतर्गत गोदाघाटावरील गौरी पटांगणावर महारांगोळी रेखाटण्यात आली. शुक्रवारी (दि. १६) गौरी पटांगणावर २५ हजार चौरस फुटाची महारांगोळी काढण्यात आली. पहाटे ६ वाजता समितीच्या प्रमुख आसावरी धर्माधिकारी यांच्यासह ३०० सदस्य रांगोळी, रंग आदींसह गौरी पटांगणावर हजर झाल्या होत्या. प्रारंभी मानाचा बिंदू ठेवून महारांगोळीस प्रारंभ करण्यात आला. यंदा गो-सेवा संकल्पनेवर आधारित ही महारांगोळी तीन ते चार तासांत पूर्ण झाली. याप्रसंगी गोसेवा क्षेत्रात काम करणारे प्रसिद्ध उद्योजक नेमिचंद पोद्दार, रतनलाल बाफणा आदी मान्यवर उपस्थित होते. गोसेवा क्षेत्रात होत असलेल्या कामाची त्यांनी यावेळी माहिती दिली. सायंकाळी समितीच्या सदस्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी गोसेवेचे महत्त्व, गोधनाचे मानवी जीवनातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी १८ टन रांगोळी वापरण्यात आली. भव्यदिव्य व योग्य रंगसंगती साधलेली ही रांगोळी लक्षवेधी ठरत आहे.