HSC Result: नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९१.३१ टक्के, यावर्षी तीन टक्क्यांनी निकाल घसरला
By दिनेश पाठक | Updated: May 5, 2025 16:23 IST2025-05-05T16:21:38+5:302025-05-05T16:23:13+5:30
Maharashtra HSC Result 2025: नाशिक माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल ९१.३१ टक्के लागला.

HSC Result: नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९१.३१ टक्के, यावर्षी तीन टक्क्यांनी निकाल घसरला
नाशिक माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल ९१.३१ टक्के लागला. नाशिक विभागात एकूण एक लाख ५८ हजार ५९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी एक लाख ५७ हजार ८४२ विद्यार्थी परीक्षेत बसले. यातील एक लाख ४४ हजार १३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. राज्यात नऊ विभागांमध्ये निकालात नाशिकचा सातवा क्रमांक आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी विभागाचा निकाल ३.४ टक्क्यांनी घसरला आहे.
माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने २५ मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल नाशिक माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे आणि विभागीय सचिव एम. एस. देसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये घोषित केला. इयत्ता बारावीच्या निकालामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्याने प्रथम स्थान मिळविले आहे. नाशिक जिल्ह्याचा निकाल हा ९५.६१ टक्के तर नाशिक विभागीय मंडळाचा निकाल ९१.३१ टक्के लागला. मागच्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये नाशिक माध्यमिक मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल ९४.७१ टक्के लागला होता. त्याच्या तुलनेत यावर्षीचा इयत्ता बारावीचा निकाल ३.४ टक्क्यांनी घसरला.
नाशिक जिल्ह्यामध्ये ७१ हजार १२० परीक्षार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी ६९ हजार ९१२ परीक्षेला बसलेले विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. जिल्ह्याचा निकाल ९५.६१ टक्के लागला. नाशिक विभागांमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये ४४ हजार ७३६ विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले होते, त्यापैकी ४२ हजार २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगाव जिल्ह्याचा निकाल हा ९४.५२ टक्के लागलेला आहे तर नंदुरबार जिल्ह्यात १६ हजार ९१६ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी १४ हजार ६५४ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. जिल्ह्याच्या निकाल ८६.६२ टक्के लागला आहे. तर, धुळे जिल्ह्यामध्ये २३ हजार ७० विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी १७ हजार २७५ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत, जिल्ह्याचा निकाल ७४.८८ टक्के लागला आहे.