नाशिक / इंदिरानगर - लोकशाहीचा उत्सव सर्वत्र शांततेत पार पडत असताना वडाळा गावात सायंकाळी महिला मतदारांना वाटेत अडवून त्यांना पैशांचे प्रलोभन देऊन बोटाला शाई लावण्याचा प्रकार उघडकीस आला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजवाड्याकडे जाणाऱ्या बोळीत संशयित पवन बागुल (रा. इंदिरानगर) याला रंगेहाथ पकडून केबीएच विद्यालय मतदान केंद्राजवळ घेऊन जात पोलिसांच्या हवाली केले.
वडाळा गावातील गोपाळवाडी, गरीब नवाज कॉलनी, आदी भागांतून मतदानासाठी बाहेर पडलेल्या महिलांना वाटेत थांबवून बागुल हा पैसे देत त्यांना मतदानाला जाऊ नका, असे सांगून बोटाला शाई लावत होता, असा दावा 'मविआ'च्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्याच्याकडे शाईदेखील सापडल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा युवक एका माजी नगरसेवकाचा जवळचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.
बागुलचे हात शाईने माखलेले आढळून आले. बागुल याला जय कोतवाल, रमीज पठाण, सनी साळवे, संजय साळवे, आदींनी पकडून केबीएच विद्यालयाजवळ बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या हवाली केले. यानंतर पोलिसांनी त्याला वाहनात बसवून पोलिस ठाण्यात नेले. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोलिस ठाण्याच्या बाहेर तळ ठोकून होते. गुन्हा दाखल करण्याचे र आश्वासन दिल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारातून काढता पाय घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचा पुरेपूर प्रयल वडाळ्यात भाजपाकडून केला गेला. इतक्या खालच्या पातळीवर जात लोकशाहीची संबंधितांनी हत्या केली. बागुलचे हात शाईने माखलेले असल्याचे पोलिसांनीही मान्य केले. त्याला पकडून पोलिसांकडे घेऊन जात असताना त्याने भाजपच्या एका माजी नगरसेवकाच्या पुतण्याला फोन केल्याचे त्याच्या मोबाइलमध्ये आढळून आले आहे.
- जय कोतवाल, मविआ कार्यकर्ता
वडाळ्यातील प्रकाराची गंभीर दखल घेतलेली आहे. उपायुक्त, सहायक आयुक्त यांना या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत. सर्वत्र मतदान शांततेत पार पडले. लोकशाहीमध्ये असे प्रकार करणे योग्य नाही, संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी करून पोलिस कारवाई करतील.
- संदीप कर्णिक, पोलिस आयुक्त