महंतांचा आता ‘कमर्शियल ब्रेक’!
By Admin | Updated: August 17, 2015 23:45 IST2015-08-17T23:45:16+5:302015-08-17T23:45:49+5:30
व्यावसायिक पवित्रा : चक्क पाण्याच्या बाटल्यांचे उद्घाटन अन् जाहिरातही

महंतांचा आता ‘कमर्शियल ब्रेक’!
नाशिक : काही दिवसांपूर्वी ‘ते’ प्रशासनावर प्रचंड कोपले होते... कुंभमेळ्यातील असुविधांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत होते... हळूहळू त्यांचा राग शांत होऊ लागला... आता ते प्रशासनाच्या कामावर एवढे खूश आहेत की, ‘अशा सुविधांचा स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता’, अशी वाक्ये त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागली आहेत... असा सारा ‘सुखाचा’ काळ आल्यानेच बहुधा ते आता छोटासा ‘कमर्शियल ब्रेक’ही घेऊ लागले आहेत... त्यामुळेच चक्क पाण्याच्या बाटल्यांच्या कंपन्यांनाही त्यांचा ‘कृपाशीर्वाद’ प्राप्त होऊ लागला आहे...
सतत माध्यमांच्या प्रकाशझोतात असलेल्या श्री महंतांचे हे वर्णन आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी याच श्री महंतांनी हिमालयातल्या एका बाबांवर आगपाखड केली होती. या बाबांनी साधुग्राममध्ये दुकानदारी थाटली असून, लोकांकडून असे पैसे गोळा करणे योग्य नसल्याची पुस्ती त्यांनी जोडली होती; मात्र याच महोदयांनी आता चक्क पाण्याच्या बाटल्यांच्या उत्पादनाचे उद्घाटन आणि जाहिरातही केल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावून गेल्या. या बाटल्या कुंभमेळ्यात ना फुकट वाटल्या जाणार आहेत, ना सवलतीत. मग महंतांची अशा एखाद्या व्यावसायिक उत्पादनावर ‘कृपादृष्टी’ कशासाठी, असा प्रश्न अनेकांना पडलाच; शिवाय महंतांच्या या ‘कमर्शियल ब्रेक’चेही आश्चर्य वाटून गेले.
त्याचे झाले असे की, श्री महंतांची ‘तातडीची पत्रकार परिषद’ असल्याचे लघुसंदेश आज सायंकाळी पत्रकारांच्या भ्रमणध्वनीवर झळकले. ध्वजारोहण दोन दिवसांवर येऊन ठेपले असताना, असा निरोप मिळाल्याने झाडून सारे पत्रकार महंतांकडे धावले खरे; पण पत्रकार परिषदेऐवजी एका कंपनीच्या मिनरल वॉटरच्या उत्पादनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रमच तेथे पाहावयास मिळाला. खुद्द महंतांच्या शुभहस्ते पाण्याच्या बाटल्यांचे उद्घाटन झाले. महंतांनी मोठ्या थाटात लाल रिबिनीची गाठ काढत पाण्याची एक बाटली हातात घेतली. मग एका हातात बाटली अन् दुसऱ्या हाताने त्याच बाटलीला आशीर्वाद असे फोटोसेशन झाले... जरा वेळाने महंतांनी या कंपनीचे गुण गाण्यास सुरुवात केली. या बाटल्यांतील पाणी थेट त्र्यंबकेश्वरहून आणले गेल्याचे दाखलेही दिले गेले... तेवढ्यात योगायोगाने ठसका लागला, महंतांनी बाटलीतले दोन घोट पाणी प्राशनही केले अन् कंपनीच्या अधिकाऱ्यांना धन्य झाल्याचीच अनुभूती आली... या सोहळ्याला उपस्थित असणाऱ्यांना मात्र काही दिवसांपूर्वी ‘समोरच्या’ बाबांना फटकारणारे ते हेच का, असा प्रश्न पडून गेला... (प्रतिनिधी)