महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला;
By Admin | Updated: June 9, 2015 02:15 IST2015-06-09T02:13:00+5:302015-06-09T02:15:20+5:30
महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला;

महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला;
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपल्याने साधुग्रामसह अन्य कामे उरकण्याचे आव्हान एकीकडे पेलणाऱ्या प्रशासनाला नाशिकमध्ये ठाण मांडून बसलेले आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनाही सांभाळण्याची कसरत करावी लागते आहे. महंतांच्या वेगवेगळ्या विधानांमुळे प्रशासनाची करमणूकही होताना दिसून येत आहे. रविवारी पावसाने साधुग्रामची दाणादाण उडाल्यानंतर सोमवारी सकाळी ‘रामायण’वर औपचारिकपणे बोलताना महंत ग्यानदास यांनी कामांबद्दल नाराजीचा सूर लावला; मात्र तासाभरातच साधुग्राममध्ये झालेल्या पाहणी दौऱ्यात महंतांनी प्रशासनाला प्रशस्तिपत्रक बहाल केल्याने माध्यम प्रतिनिधींसह पदाधिकारी व अधिकारीही चकित झाले. तासाभरातच महंतांची दोन रूपं पाहायला मिळाली. रविवारी पावसामुळे तपोवनातील साधुग्राममध्ये उभारण्यात आलेल्या शौचालय व स्नानगृहांचे पत्रे उडून नुकसान झाले होते. याशिवाय ठिकठिकाणी पाणी साचून विजेचे खांबही वाकले होते. पहिल्याच पावसाने साधुग्रामची दैना उडाल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. सोमवारी सकाळी साधुग्राममधील नुकसानीची पाहणी करण्यासाठी महापौरांनी दौऱ्याचे आयोजन केले होते. या दौऱ्यासाठी महापौरांच्या ‘रामायण’ निवासस्थानी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदासही उपस्थित झाले. यावेळी ‘रामायण’वर माध्यम प्रतिनिधींसह महापालिकेचे पदाधिकारी व अधिकारीही हजर होते. याचवेळी महंतांनी प्रशासनाच्या कामाबद्दल नाराजीचा सूर लावला. प्रशासनाकडून कमिशन घेतले जात असल्यानेच कामे निकृष्ट होत असल्याचा आरोप करताना महंतांनी दहा मिनिटांच्या पावसाने एवढे नुकसान झाले, तर दोन तास पाऊस झाल्यास काय अवस्था होईल, अशी भीतीही व्यक्त केली. याचवेळी महंतांनी महापौरांचेही उपरोधिक स्वरात कान पिळले. महंतांचा नूर पाहून पदाधिकाऱ्यांसह अधिकारीवर्गही तणावाखाली आला. पुढच्या दौऱ्यात काय वाढून ठेवले आहे, या भीतीखालीच तपोवनाकडे सर्वांनी प्रस्थान केले. साधुग्राममधील कामांची पाहणी केल्यानंतर महंतांचे मात्र सौम्य रूप समोर आले आणि सारेच अवाक् होतानाच अधिकारीवर्गाने सुटकेचा नि:श्वासही सोडला. ‘ये नैसर्गिक आपत्ती है, ऐसा थोडाबहुत कुछ होता रहेता है’ असे सांगत महंतांनी प्रशासनाकडून साधुग्राम उभारणीचे काम उत्तम असल्याचे प्रशस्तिपत्रक बहाल केले. याशिवाय आम्ही ३० जूननंतर येऊ तोपर्यंत कामांसाठी अवधीही देत असल्याचे सांगितल्याने प्रशासनाचा जीव भांड्यात पडला. तासाभरापूर्वी प्रशासनावर आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या महंतांनी साधुग्राममध्ये मात्र मवाळ भूमिका घेतल्याने नेमकी काय जादू झाली, यावरच नंतर पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)