The magnificent pane of Saturn in Nastanpur will be reflected in Nashik | नस्तनपूरच्या शनीच्या महतीचे फलक नाशिकमध्ये झळकणार

नस्तनपूरच्या शनीच्या महतीचे फलक नाशिकमध्ये झळकणार

ठळक मुद्देसंस्थान परिसरात पूर्ण झालेल्या वाहनतळाचा लोकार्पण सोहळा व नवीन बाग-बगीचाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आला.

नांदगाव : तालुक्यातील नस्तनपूर हे प्रभू रामचंद्र स्थापित प्राचीन देवस्थान असल्याने नाशिक महानगरात आगामी काळात नस्तनपुर शनैश्चर संस्थांनची महती सांगणारे दिशादर्शक फलक ठिकठिकाणी लावण्याचा मनोदय नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नस्तनपुर भेटीत व्यक्त केला. गमे यांच्या हस्ते सपत्नीक श्रावणी शनिवार (दि.१७) निमित्त शनैश्चर महाराजांची महाभिषेक पूजा झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अश्विनी आहेर यांच्या निधीतून संस्थान परिसरात पूर्ण झालेल्या वाहनतळाचा लोकार्पण सोहळा व नवीन बाग-बगीचाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थांनचे अध्यक्ष नारायण अग्रवाल होते तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अशोक खुटाडे उपस्थित होते. गमे यांनी सांगितले, शासन निधीचा सुयोग्य पद्धतीने विनियोग झाला तर किती चांगल्या प्रकारे काम होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे श्री क्षेत्र नस्तनपुर आहे.. श्रीक्षेत्र नस्तनपुरला पंचवीस वर्षापूर्वी भेट दिली होती. या पंचवीस वर्षाच्या कालावधीत देवस्थानाने केलेली प्रगती आश्चर्यकारक आहे. येथील स्वच्छता व शिस्तही मनाला भावणारी आहे. असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. यावेळी अश्विनी आहेर, संस्थांनचे अध्यक्ष नारायण अग्रवाल, अ‍ॅड. अशोक खुटाडे,जगन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थानचे जनरल सेक्र ेटरी माजी आमदार अ‍ॅड. अनिल आहेर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार उदय पवार यांनी मानले. यावेळी संस्थांचे विश्वस्त विजय चोपडा, खासेराव सुर्वे ,शरद आहेर, उदय पवार, समाधान पाटील, डॉ प्रभाकर पवार, डॉ.प्रवीण निकम, भास्कर शेवाळे, कैलास गायकवाड, दर्शन आहेर, माजी नगराध्यक्ष चेतन पाटील, प्रताप गरु ड, नूतन कासलीवाल, रमेश काकळीज, नवनाथ बोरसे, अनिल सरोदे, शिवाजी बच्छाव आदी उपस्थित होते.

Web Title:  The magnificent pane of Saturn in Nastanpur will be reflected in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.