नाशिकचा संदर्भकोष मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन
By धनंजय वाखारे | Updated: April 26, 2025 11:18 IST2025-04-26T11:17:35+5:302025-04-26T11:18:01+5:30
नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मधुकर झेंडे यांनी अ. भा. मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्षपद देखील भूषविले होते.

नाशिकचा संदर्भकोष मधुकर झेंडे यांचे वृद्धापकाळाने निधन
नाशिक : नाशिकचा चालता बोलता संदर्भकोष अशी अभिमानास्पद ओळख प्राप्त केलेले मधुकर झेंडे यांचे आज शनिवारी (दि. 26) पहाटे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. मृत्यसमयी ते ८८ वर्षांचे होते. नाशिक महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी या नात्याने ते २८ वर्षांपूर्वी महापालिकेतून सेवानिवृत्त झाले. परंतु त्यानंतरही सुमारे १० वर्षे ते मानद अधिकारी म्हणून कार्यरत होते. भूतपूर्व नगरपालिका तसेच १९८२ पासून स्थापित झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या अनेक स्थित्यंतरांचे मधुकर झेंडे साक्षीदार होते.
१८५ वर्षांपूर्वी स्थापित झालेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या प्रगतीमध्ये मधुकर झेंडे यांचा सिंहाचा वाटा आहे. सामान्य कार्यकर्ता ते सावानाचे अध्यक्ष अशी ४० वर्षांची प्रदीर्घ कामगिरी झेंडे यांनी केली. सन २००८ ते २०१२ या कार्यकाळात त्यांनी वाचनालयाचे अध्यक्षपद भूषविले. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या स्थापनेमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविणाऱ्या मधुकर झेंडे यांनी अ. भा. मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखेचे अध्यक्षपद देखील भूषविले होते. १०१ वर्षांची अभिमानास्पद वाटचाल करणाऱ्या नाशिक वसंत व्याख्यानमालेचे कार्याध्यक्ष पद देखील झेंडे यांनी भूषविले होते.
भद्रकाली मार्केट परिसरात अत्यंत गरीब परिस्थितीत वाटचाल करणाऱ्या मधुकर झेंडे यांनी लहानपणी मोहन मास्तर तालीम येथे व्यायाम करून शरीर कमावले आणि अनेक कुस्त्यांचे फडदेखील गाजविले. लोकरंजन कलाकेंद्राची स्थापना करून अनेक नाट्य कलावंतांना घडविण्याचे काम केले. लहानपणी विविध मेळयांमध्ये सहभागी होऊन झेंडे यांनी रंगमंच देखील गाजविला. लोकहितवादी मंडळ, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड यासारख्या असंख्य सामाजिक संस्थांशी झेंडे यांचा निकटचा संबंध होता.
आण्णा अशी ओळख असलेल्या मधुकर झेंडे यांनी नाशिकच्या चौकांचा इतिहास हे संदर्भ कोष ठरलेले पुस्तक देखील लिहिले. नाशिकच्या सुमारे ७० वर्षांची वाटचाल मुखोद्गत असलेले मधुकर झेंडे हे नाशिकचा संदर्भकोष म्हणून देखील ओळखले जायचे.
लोकशाहीर गजाभाऊ बेणी आणि मित्रमंडळींच्या सहकार्याने मधुकर झेंडे यांनी १९६१ साली नाशिकच्या शिवाजी उद्यानामध्ये मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचा अर्धपुतळा उभारला होता. तेव्हापासून त्यांचे लता मंगेशकर आणि कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले होते. सुप्रसिद्ध संगीतकार कल्याणजी आनंदजी, बिनाका गीतमालाचे प्रसिद्ध निवेदक अमीन सायानी यांसह अनेक दिग्गजांशी झेंडे यांचे घरोब्याचे संबंध होते. नाशिकच्या सहा कुंभमेळ्यांचे ते साक्षीदार होते.
झेंडे यांच्या पश्चात मुलगा राजेंद्र, मुलगी रेखा व रत्ना, जावई प्रकाश पाटील व आल्हाद वाघ, सून, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. मधुकर झेंडे यांच्या निधनामुळे समाजातील विविध स्तरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे. झेंडे यांचा अंत्यविधी शनिवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता नाशिक अमरधाम येथे होईल.