जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी स्किन आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:17 IST2021-09-21T04:17:01+5:302021-09-21T04:17:01+5:30
नाशिक: जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी स्किन या विषाणूजन्य आजाराचा फैलाव झाला असल्याने त्यांच्यावरील उपचारासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात अशा ...

जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी स्किन आजार
नाशिक: जिल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पी स्किन या विषाणूजन्य आजाराचा फैलाव झाला असल्याने त्यांच्यावरील उपचारासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यात अशा प्रकारे जनावरे आढळून येत असल्याने बाधित जनावरांसाठी उपचार मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून गिरणारे येथे नुकतेच मोफत औषध वाटप तसेच जनजागृती मोहीम राबविण्यात आली. आजाराचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी ग्रामपंचायतींकडूनदेखील प्रयत्न केले जात आहेत.
जिल्ह्यातील जनावरांमध्ये आढळून येत असलेला लम्पी स्किन हा आजार विषाणूजन्य तसेच संसर्गजन्य आहे. या आजारामुळे जनावरांच्या अंगावर गाठी येतात, जनावरांना ताप येतो, चारा खाणे कमी होते व परिणामी उत्पादनात घट होते. या अनुषंगाने जिल्ह्यात आरोग्य तपासणी, उपचार आणि जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नाशिक ग्रामपंचायतीच्या वतीने गिरणारे पशुवैद्यकीय दवाखाना येथे पशुपालकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.
आजाराचा होणारा फैलाव आणि त्यामुळे पशुपालकांना मोठे नुकसान होण्याची शक्यता असून वेळीच या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात मोफत औषधे वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी याबाबतचे आदेश जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिले आहे. पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. बाबुराव नरवाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे तसेच गटविकास अधिकारी डाॅ. सारिका बारी, विनोद मेढे, डाॅ कविता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गिरणारे पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रमुख डाॅ. भगवान पाटील यांनी ग्रामपंचायत गिरणारे येथे उपक्रम राबविला. सरपंच अलका दिवे, उपसरपंच छबूबाई आत्माराम थेटे व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक राजगुरू भाऊसाहेब यांनीही तत्काळ मोहिमेची अंमलबजावणी केली.
याप्रसंगी नितीन गायकर, अनिल थेटे, आत्माराम थेटे, संजय खंडेराव थेटे, ज्ञानेश्वर थेटे, शुभम थेटे, श्रीकांत विसपुते, निवृत्ती जोंधळे, पुंडलिक घुले, राजाराम भोर आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. सुनील संत, डॉ. अरविंद पवार, डॉ. युवराज वाणी, डॉ. वैभव शिंदे, प्रकाश वाघ यांचे सहकार्य लाभले.
200921\20nsk_22_20092021_13.jpg
कॅप्शन: गिरणारे येथे पशुपालकांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.