अत्यल्प पाणीपुरवठा
By Admin | Updated: February 22, 2017 23:16 IST2017-02-22T23:16:19+5:302017-02-22T23:16:35+5:30
इंदिरानगर : उन्हाळ्याच्या प्रारंभीच टंचाई

अत्यल्प पाणीपुरवठा
इंदिरानगर : परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गंगापूर धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशुन्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून पाटील गार्डन, देवेंद्र सोसायटी, महारुद्र कॉलनी, जिल्हा परिषद कॉलनी, अरुणोदय सोसायटी, देवदत्त सोसायटी, मानस कॉलनी, मोदकेश्वर सोसायटीसह परिसरात अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे जेमतेम पिण्याचे पाणीसुद्धा येत नाही. वापराचे पाणीसुद्धा अन्य ठिकाणाहून घ्यावे लागत आहे. आताच उन्हाळ्याची चाहूल लागली आहे तर पाण्याची अशी परिस्थिती राहिल्यास पुढे चार महिने काय परिस्थिती राहील, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
धरणात जलसाठा मुबलक असतानाही परिसरातील जलकुंभ भरले जात नाही. त्यामुळे पाणीपुरवठा होत नाही असे उत्तर पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे नेहमीचे असल्याने नागरिकांनी तक्रार केली आहे. येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नागरिक जनआंदोलन छेडणार आहे.