हरविलेली पेन्शनची रक्कम ‘त्या’ दोघांमुळे मिळाली परत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 18:03 IST2020-12-17T18:02:35+5:302020-12-17T18:03:06+5:30
सटाणा : सध्याच्या काळात पैसा हेच मानवाचे सर्वस्व होऊन बसले आहे. पन्नास हजार रुपये सापडल्यानंतर कोणालाही त्याचा मोह होईल, मात्र येथील सटाणा मर्चंट्स को-ऑपरेटीव्ह बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी व ग्राहकाने बँकेच्या पायरीवर पडलेली एका ज्येष्ठ नागरिकाच्या पेन्शनची पन्नास हजार रुपयांची रक्कम बँकेकडे सुपूर्द करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले.

हरविलेली पेन्शनची रक्कम ‘त्या’ दोघांमुळे मिळाली परत!
येथील पंडित त्र्यंबक सोनवणे यांनी गेल्या मंगळवारी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून पेन्शन खात्यावरील पन्नास हजार रुपये काढले. यानंतर समको बँकेच्या सेव्हिंग खात्यात ही रक्कम भरण्यासाठी ते दुपारी एक वाजता आले असता नजरचुकीने बँकेच्या पायरीवर पन्नास हजार रुपयांचे बंडल पडले, मात्र ते त्यांच्या लक्षात आले नाही. ते पैसे भरण्यासाठी काउंटरवर आले असता पन्नास हजार रुपये कुठेतरी पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पुन्हा महाराष्ट्र बँक गाठून चौकशी केली, मात्र तेथेही पैसे सापडले नाहीत. कौटुंबिक कारणांमुळे त्यांनी इतरत्र कुठेही याबाबत वाच्यता केली नाही किंवा बँक प्रशासनाकडे तक्रारही न करता त्यांनी सरळ घर गाठले.
दरम्यान, बँकेचे अल्पबचत प्रतिनिधी चंद्रकांत अहिरराव व बँकेचे ग्राहक निलेश कायस्थ यांना बँकेच्या पायरीवर पन्नास हजार रुपयांचे बंडल सापडले. त्यांनी ही रक्कम प्रामाणिकपणे बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र बागड यांच्याकडे जमा केले. बागड यांनी ही घटना बँकेचे अध्यक्ष कैलास येवला आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र याबाबत कुणाचीही तक्रार न आल्याने सिसिटीव्ही फुटेजच्या आधारे पंडित सोनवणे यांच्याकडून पन्नास हजार रुपये पडल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. सोनवणे यांना फोनद्वारे या प्रकाराबाबत विचारणा केली असता त्यांनी दि. ८ रोजी पैसे गहाळ झाल्याचे सांगितले. त्यानंतर अध्यक्ष येवला यांच्या हस्ते सोनवणे यांना बुधवारी (दि.१६) ती रक्कम परत करण्यात आली. तर प्रामाणिकपणाबद्दल अल्पबचत प्रतिनिधी अहिरराव आणि बँकेचे ग्राहक कायस्थ यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष कल्पना येवला, संचालक दिलीप चव्हाण, प्रकाश सोनग्रा, पंकज ततार, प्रवीण बागड, दिलीप येवला, जगदीश मुंडावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी देवीदास बागडे, शाखाधिकारी जितेंद्र बागड, देवेंद्र बिरारी, भरत पवार आदि उपस्थित होते.