हरवलेले नितीन पवार व्हिडीओद्वारे प्रगटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 07:43 PM2019-11-24T19:43:51+5:302019-11-24T19:45:18+5:30

राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर नॉट रिचेबल असलेले जिल्ह्यातील आमदार नितीन पवार अखेर व्हिडीओद्वारे प्रगटल्याने त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला आहे.

 Lost Nitin Pawar revealed via video | हरवलेले नितीन पवार व्हिडीओद्वारे प्रगटले

हरवलेले नितीन पवार व्हिडीओद्वारे प्रगटले

Next

नाशिक : राज्यातील सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडींनंतर नॉट रिचेबल असलेले जिल्ह्यातील आमदार नितीन पवार अखेर व्हिडीओद्वारे प्रगटल्याने त्यांच्या समर्थकांनी सुस्कारा सोडला आहे.
शनिवारी सकाळी राजभवनात फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी झाल्याने जो राजकीय भूकंप झाला त्यावेळी नाशिक जिल्ह्यातील आमदार माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ व दिलीप बनकर हे तिघे उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले होते. या शपथविधी समारंभानंतर हे तिघेही आमदार नॉट रिचेबल झाले होते. तर शनिवारी सकाळी मुंबईकडे निघालेले कळवणचे आमदार नितीन पवारदेखील संपर्काबाहेर गेले होते. यातील दिलीप बनकर हे कुटुंबीयांतील एकाच्या शस्त्रक्रियेच्या निमित्ताने शनिवारी सायंकाळीच नाशकात आले व पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षासोबत व पवार कुटुंबीयांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र झिरवाळ, कोकटे व नितीन पवार यांचा संपर्क होऊ शकला नव्हता. कोकाटे यांना गुजरातमध्ये, तर नितीन पवार व झिरवाळ यांना दिल्लीत पाठविण्यात आल्याचेही म्हटले जात होते. परंतु कोणाचाही संपर्क होत नसल्याने अधिकृत माहिती मिळू शकत नव्हती. त्यामुळे शनिवारी रात्री उशिराने झिरवाळ व नितीन पवार यांच्या कुटुंबीयांनी ते हरविल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.
दरम्यान, रविवारच्या मुंबईतील राष्टÑवादीच्या बैठकीत आमदार कोकाटे उपस्थित राहिल्याचे बोलले गेले, तर नितीन पवार यांचा स्वत:चा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला. आपण सुरक्षित असून, पक्षासोबतच असल्याचे त्यांनी या व्हिडीओत म्हटले असले तरी, यावेळची त्यांची देहबोलीवरून ते तणावात असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. त्यामुळे ते सुरक्षित असतील व पक्षासोबतही असतील तर एवढे तणावात कसे, असा प्रश्न मतदारसंघातील त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. व्हिडीओद्वारे प्रगटणारे नितीन पवार कुटुंबीयांना किंवा आपल्या समर्थकांना प्रत्यक्ष अथवा मोबाइलव्दारे का संपर्क करू शकलेले नाही, असाही प्रश्न उपस्थित होत असून, त्यामुळे त्यांच्याबद्दलचा संभ्रम वाढून गेला आहे. तथापि, राष्टÑवादीच्याच पदाधिकाऱ्यांकडून झिरवाळ व नितीन पवार हे पक्षाच्या संपर्कात आल्याचे सांगितले गेल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी व समर्थकांनीही सुस्कारा सोडला आहे.

Web Title:  Lost Nitin Pawar revealed via video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.