लालपरीची चाके थांबल्याने प्रतिदिन साडेतीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:50 IST2021-05-09T21:17:12+5:302021-05-10T00:50:49+5:30
पेठ : मागील वर्षी कोरोनाच्या संकटात सापडलेली लालपरी दिवाळीनंतर थोड्याफार प्रमाणात रुळावर येऊ पाहत असताना याही वर्षी मार्चपासून पुन्हा एकदा लालपरीची चाके थांबली गेल्याने पेठ आगाराला दररोज जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

लालपरीची चाके थांबल्याने प्रतिदिन साडेतीन लाखांचे नुकसान
पेठ : मागील वर्षी कोरोनाच्या संकटात सापडलेली लालपरी दिवाळीनंतर थोड्याफार प्रमाणात रुळावर येऊ पाहत असताना याही वर्षी मार्चपासून पुन्हा एकदा लालपरीची चाके थांबली गेल्याने पेठ आगाराला दररोज जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
आदिवासी भागातील दऱ्याखोऱ्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी पेठ येथे बस आगार सुरू करण्यात आले असले तरी डोंगराळ प्रदेश, खराब रस्ते व प्रवाशांची अत्यल्प संख्या यामुळे पेठ आगाराला नेहमीच तोटा सहन करत प्रवासी सेवेचे ब्रीद जपावे लागले असताना कोरोनाच्या महामारीने मागील वर्षापासून परिवहन महामंडळाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पेठ आगारातून नाशिकसह पूणे, नगर, जळगाव, शिर्डी या प्रमुख मार्गावर बसेस धावत असतात. ग्रामीण भागातही हरसूल, दिंडोरी, ननाशी, जाहूले, भनवड, कळमुस्ते आदी मार्गावर बसफेऱ्या सुरू असताना कोरोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी घालून दिलेल्या निर्बंधामुळे पेठ आगारातील जवळपास ३५ गाड्या बंद करण्यात आल्या असून, पेठ ते नाशिक मार्गावर अत्यावश्यक सेवेसाठी दोन बसेस सुरू आहेत.
त्यातही ५० टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक केली जात असून, पेठ आगाराची दररोज १२ हजार किमीची धाव थबकल्याने साडेतीन लाख रुपयांचा तोटा एसटी महामंडळाला सहन करावा लागत आहे.
१८६ कर्मचाऱ्यांचे लसीकरण
कोरोना काळात सेवा बजावणाऱ्या चालक-वाहकांसह प्रशासकीय कामकाज करणाऱ्या १८६ अधिकारी व कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. २१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असली तरी आता सर्वांची तब्बेत सुधारत आहे.
तसेच अत्यावश्यक सेवेसाठी वापरात येणाऱ्या बसेस आगारातून बाहेर काढण्यापूर्वी निर्जंतुकीकरण केल्या जात असून, चालक-वाहकही आवश्यक ती काळजी घेत आहेत.
पेठ हा दुर्गम तालुका असून, प्रवाशांकडे दळणवळणाची स्वतःची फारशी साधने नसल्याने महामंडळाच्या बसेसवर प्रवासी अवलंबून असतात. प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती व खराब रस्त्यामुळे जमा खर्चाचे गणित जुळत नसले तरी प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या बसेसला एक वर्षापासून ब्रेक लागल्याने महामंडळाला करोडोंचे नुकसान सहन करावे लागत आहे.
-स्वप्नील अहिरे, आगार व्यवस्थापक, पेठ
पेठ आगारातील सांख्यिकी स्थिती
एकूण वाहने - ३७
बंद असलेली वाहने - ३५
चालक संख्या - ८४
वाहक संख्या - ९३
यांत्रिकी संख्या - ३०
प्रशासकीय कर्मचारी - २४
कोरोनाबाधित कर्मचारी - २१.