तोतया पोलिसांनी वृद्धेला लुटले
By Admin | Updated: July 23, 2015 00:28 IST2015-07-23T00:21:18+5:302015-07-23T00:28:12+5:30
तोतया पोलिसांनी वृद्धेला लुटले

तोतया पोलिसांनी वृद्धेला लुटले
नाशिक : पोलीस असल्याची बतावणी करून एका वृद्धेच्या गळ्यातील ३८ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची लूट केल्याची घटना नाशिकरोडला डावखरवाडी येथे घडली़
याबाबत अधिक माहिती अशी की, डावखरवाडीतील सफायर पार्क येथील रहिवासी चित्रा सुब्रमण्यम (६४) या मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खांडरे चौकातून बिगबाजारकडे सत्संगासाठी जात होत्या़ त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांना थांबवत पोलीस असल्याचे सांगितले़ तसेच दरडावण्याच्या स्वरात सोन्याचे दागिने घालून कुठे चाललात, दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगितल्याने त्यांनी दागिने काढून पर्समध्ये ठेवले़ यानंतर हे दागिने व्यवस्थित ठेवलेत का हे पाहण्याचा बहाणा करून त्यातील सोन्याचा गोफ, सोन्याचे मणी व चांदीचे पैंजण असे ३८ हजार रुपयांचे दागिने काढून घेतले़
या प्रकरणी सुब्रमण्यम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगर पोलीस ठाण्यात दोघा तोतया पोलिसांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
दुचाकीच्या धडकेत वृृद्धाचा मृत्यू
भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पायी जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि़२१) सकाळच्या सुमारास मदिनाचौक समांतर रस्त्यावर घडली़ अपघातात मयत झालेल्या वृद्धाचे नाव जगननिवास कुलकर्णी (८५) असे असून ते मुंबईनाक्यावरील भगवंतनगरचे रहिवासी आहेत़ मंगळवारी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास ते समांतर रस्त्याने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने (एमएच १५ बीबी ३२०२) त्यांना जोरदार धडक दिली, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी दुचाकीचालक सचिन बाबूराव थोरात (३३, वाल्मिकनगर, पंचवटी) यांच्याविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)