तळवाडे आरोग्य उपकेंद्रास ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
By Admin | Updated: May 13, 2014 19:31 IST2014-05-13T19:30:36+5:302014-05-13T19:31:35+5:30
मालेगाव : तालुक्यातील तळवाडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राद्वारे आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी या आरोग्य उपकेंद्रास टाळे लावले.

तळवाडे आरोग्य उपकेंद्रास ग्रामस्थांनी ठोकले कुलूप
मालेगाव : तालुक्यातील तळवाडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राद्वारे आरोग्य सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी या आरोग्य उपकेंद्रास टाळे लावले. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या आरोग्य प्रशासनाने गावातील रुग्ण तपासणीसाठी डॉक्टरांचे एक पथक गावात पाठविले. साधारण दहा हजार लोकसंख्या असलेल्या तळवाडे गावात जिल्हा प्राथमिक आरोग्यकेंद्र वडनेरअंतर्गत उपकेंद्र आहे. या ठिकाणी एक आरोग्यसेवक व परिचारिकेची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र सदर आरोग्य उपकेंद्र हे एक दोन दिवसांनंतर सलग आठ ते दहा दिवस बंद राहते. त्यामुळे गोरगरीब ग्रामस्थांना उपचारासाठी खासगी रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागतो. प्रसंगी मालेगावी उपचारासाठी धाव घ्यावी लागते. यासंदर्भात आरोग्य यंत्रणेला वेळोवेळी माहिती देऊनही येथील आरोग्य उपकेंद्राच्या सेवेत सुधारणा होत नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सध्या गावात तापाची साथ सुरू आहे. गावातील बहुसंख्य रुग्ण हे मालेगावातील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र तरीही गावातील हे आरोग्य उपकेंद्र बंदच आहे. त्याच्या निषेधार्थ गावातील उन्नती मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मिळून या आरोग्य उपकेंद्रास कुलूप लावले. सदर आरोग्य उपकेंद्र हे २४ तास सुरू ठेवण्यात यावे, याठिकाणी कायमस्वरूपी आरोग्यसेवकाची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासंदर्भात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. मोमीन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर गावातील आरोग्यसेवक प्रतिनियुक्तीवर व परिचारिका रजेवर असल्याचे सांगितले. मात्र वरिष्ठांशी याबाबत चर्चा करून या उपकेंद्राची समस्या सोडविण्यात येणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)