शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप

By Admin | Updated: May 20, 2017 02:25 IST2017-05-20T02:25:05+5:302017-05-20T02:25:16+5:30

नाशिक : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने तीन वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली

Loans against farmers are the sins of the government | शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप

शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने तीन वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे सरकारचेच पाप असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेच्या वतीने आयोजित कृषी अधिवेशनात बोलताना केला.
कृषी अधिवेशनात राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. शेट्टी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी शेतकऱ्यांचीच भाषा बोलणार, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्याला कर्जमुक्तीची मागणी करण्याची वेळ का आली, याच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे सांगत शेट्टी म्हणाले, शेतकरी कायम देण्याच्या भूमिकेत राहिला आहे परंतु आज त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यातच गेल्या दहा दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही जाऊन पोहोचले आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण बनले आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने आम्ही एनडीएसोबत राहिलो. त्यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव बांधून देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. परंतु, तीन वर्षांत मोदी सरकारने हे आश्वासन पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्तीची मागणी करण्याची वेळ आली आहे. २०१९ला होणारी लोकसभेची निवडणूक दूर नसल्याचा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला.
भाजपा वाल्याचा वाल्मिकी करायला निघाला आहे परंतु एवढ्या वाल्मिकींची महाराष्ट्राला गरज नाही, अशी टीका करताना शेट्टी यांनी सांगितले, मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करत आहेत परंतु, मागील वर्षी तुरीला ११ हजार रुपये भाव असताना यावर्षी केवळ ४ हजार रुपये भाव देण्यात आला. सोयाबीनचाही ७ हजारावरून अडीच हजारांवर भाव आला. याच सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे साडेअकरा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची अशी थट्टा खपवून घेतली जाणार नाही.
शेतकऱ्यांना अगोदर समृद्ध करा मग समृद्धी महामार्ग काढत विकासाचे मनोरे बांधा. कर्जमुक्ती हा शाश्वत उपाय नाही परंतु शेतकरी अत्यवस्थ झालेला आहे. शेतकऱ्याला उभा करायचा असेल तर त्याला कर्जमुक्तीची सलाइन दिली पाहिजे आणि उपचार म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या सूत्राची अंमलबजावणी केली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिलेल्या खुर्च्याही काढून घेण्याची ताकद शेतकऱ्यांच्या मनगटात असल्याचे शेट्टी यांनी ठणकावून सांगितले.
दरम्यान, येत्या २२ मे पासून पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यापासून मुंबईपर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार असून सेनेने साथ द्यावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.

Web Title: Loans against farmers are the sins of the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.