येवल्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 17:59 IST2019-04-13T17:59:12+5:302019-04-13T17:59:50+5:30
येवला : शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. ऐन उन्हाळ्यात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले.

येवल्यात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी
उन्हाच्या झळांनी त्रस्त झालेल्या शहरवासियांना ऐन उन्हाळ्यात पावसाच्या सरींचा अनुभव घेण्यास मिळाला. शहरात दिवसभरापासून ढगाळ वातावरण होते. दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास ढग दाटून आले आणि पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. अचानक आलेल्या सरींमुळे नागरिकांची धांदल उडाली. सध्या शहर व परिसरात उन्हाळ कांद्याच्या काढणीला सुरु वात झाली असून कांदा साठवणूकीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु आहे. त्यातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची काढलेला कांदा झाकण्यासाठी धांदल उडाली. तसेच सध्या महिला वर्गाची पापड, कुरडई यासह विविध पदार्थ बनविण्याची लगबग सुरु आहे. मात्र अकस्मात आलेल्या पावसाने महिला वर्गाचीही धावपळ उडाली. या पावसाच्या सरी बरसल्याने काही वेळ गारवा जाणवणार असला तरी त्यानंतर उकाडा जास्त वाढणार असल्याची चर्चा जेष्ठ मंडळीत सुरु होती.