शिवेसेनेची यादी उद्या होणार जाहीर
By Admin | Updated: January 30, 2017 00:29 IST2017-01-30T00:29:31+5:302017-01-30T00:29:49+5:30
अजय चौधरी : पदवीधर निवडणुकीतही पाठिंबा नाही

शिवेसेनेची यादी उद्या होणार जाहीर
नाशिक : मुंबई महानगरपालिकेत शिवसेना - भाजपा यांची युती तुटली आहे. नाशिक महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वबळावर संपूर्ण ताकदीने शिवसेना लढणार असून, येत्या मंगळवारी पालिका उमदेवारांची यादी शिवसेनेकडून जाहीर केली जाणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख आमदार अजय चौधरी यांनी दिली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी चौधरी रविवारी (दि.२९) शहरात आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, चौधरी म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद दाखविली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष कार्यरत असून, पदवीधर निवडणुकीमध्येही भाजपाच्या उमदेवारांना शिवसेनेचा पाठिंबा द्यायचा की नाही, हे पक्षप्रमुख ठरवतील. शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी ३८५ इच्छुकांचे अर्ज कार्यालयात प्राप्त झाले असल्याचे सांगत चौधरी म्हणाले, महापालिकेसाठी ८१० इच्छुकांच्या मुलाखतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुशिक्षित इच्छुकांचा समावेश आहे. नाशिक महापालिकेच्या उमेदवारांची यादी दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. युती संपुष्टात येण्यापूर्वीच आम्ही महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी केली असून, ही लढाई संपूर्ण ताकदीने लढणार आहे. (प्रतिनिधी)