त्याच्या नजरेला स्वप्नांचा प्रकाश
By Admin | Updated: June 4, 2014 01:50 IST2014-06-04T01:48:30+5:302014-06-04T01:50:51+5:30
त्याच्या नजरेला स्वप्नांचा प्रकाश

त्याच्या नजरेला स्वप्नांचा प्रकाश
नाशिक : ‘‘नियतीने आयुष्यात अंधार केला, तर परिस्थितीने तो अधिक गडद केला. डोक्यावरील छप्परही हरपलेले. रोजच्या दिवसाची भ्रांत आणि जगण्याचीही धडपड होतीच. दोष द्यायचा तरी कुणाला? आयुष्यात असे अनेक दिवस अनुभवत आणि जगत आलो आहे. कष्ट करणारी माझी आई आणि माझ्यासाठी प्रार्थना करणार्या बहिणीच्या स्वप्नांसाठी मी सुखाचे सुख स्वप्न पाहत आहे.’’ - करण जगदिश शर्मा असे या अंध विद्यार्थ्याचे नाव. त्याची ही प्रतिक्रिया. पंचवटीत राहणारा करण हा नाशिकरोडच्या के. जे. मेहता शाळेतील अंध युनिटमध्ये शिक्षण घेत आहे. इयत्ता बारावीत यश मिळाल्याने स्वप्नाच्या अधिक जवळ गेल्याचा आनंद असल्याचे करणने सांगितले. करण शर्मा हा जन्मजात अंध विद्यार्थी. घरची परिस्थिी बेताचीच. आई एका साडीच्या दुकानात कामाला, तर वडील स्वीटच्या दुकानात कारागीर म्हणून काम करीत होते. घरची परिस्थिती बेताचीच. अशा परिस्थितीतही आई-वडिलांनी शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. मुलगा शिकत असताना पाहण्याचे आयुष्य मात्र करणच्या वडिलांना लाभले नाही. त्यांचा अकाली मृत्यू झाला. काळाने आणखी क्रूर थट्टा केली. घरी आई, लहान बहीण. आईची जिद्द आणि बहिणीची माया यांनी घरचे ओझे कधीही लादले नाही. त्यामुळे करणच्या शिक्षणाचा गाडा सुरूच आहे. करण आता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. त्याला ६९.५३ टक्के गुण मिळाले आहेत. बारावीनंतर डीएड करून विशेष मुलांचे शिक्षक होण्याचे करणचे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्याचा आनंद असल्याचे करण सांगतो. करणला शिक्षक व्हायचे आहे. (प्रतिनिधी)