जीवन गौरव पुरस्कार विनायक सूर्यवंशी यांना प्रदान
By Admin | Updated: June 8, 2017 22:21 IST2017-06-08T22:21:47+5:302017-06-08T22:21:47+5:30
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एनडीसीए) यांच्यातर्फे गुरुवारी (दि. ८) वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विनायक सूर्यवंशी यांना जीवन गौरव

जीवन गौरव पुरस्कार विनायक सूर्यवंशी यांना प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (एनडीसीए) यांच्यातर्फे गुरुवारी (दि. ८) वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विनायक सूर्यवंशी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे झालेल्या या सोहळ्यात आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते सूर्यवंशी यांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार देवयानी फरांदे यांनी उपस्थित खेळाडू आणि पालकांना मार्गदर्शन करताना पारंपरिक शिक्षणाबरोबर कुठल्याही प्रकारचा खेळ खेळणे आवश्यक असल्याचे सांगितले. आपल्या जीवनात खेळ हा अविभाज्य घटक असून, खेळामुळेच जीवनातील यशापयश पचवण्याची सवय लागते, हे सांगताना नाशिक शहरातून आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटपटू जावेत, असा मानस आमदार फरांदे यांनी यावेळी व्यक्त केला. जीवन गौरव पुरस्कार प्राप्त विनायक सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंनी आपल्या खेळात सातत्य राखायला हवे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना एनडीसीएचे अध्यक्ष विनोद शाह यांनी एनडीसीएच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी राज्य शासनाच्या क्रीडा धोरणात तालुका क्रिकेट मैदान असावे याबाबत सूचना केल्या. यावेळी व्यासपीठावर उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे,आमदार देवयानी फरांदे, व्ही. व्ही. सूर्यवंशी, एनडीसीएचे अध्यक्ष विनोद शाह, सचिव समीर रकटे, हेमंत देशपांडे, गजाभाऊ आहेर उपस्थित होते.