मतमोजणीचे अधिकार्यांना दिले धडे
By Admin | Updated: May 10, 2014 00:28 IST2014-05-09T21:13:29+5:302014-05-10T00:28:03+5:30
कालिदास कलामंदिरात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

मतमोजणीचे अधिकार्यांना दिले धडे
कालिदास कलामंदिरात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
नाशिक : येत्या १६ मे रोजी नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया होत असून, या मतमोजणी प्रक्रियेसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी कालिदास कलामंदिरात उपस्थित बाराशे कर्मचारी व अधिकार्यांना दिले.
नाशिक व दिंडोरी लोकसभेची मतमोजणी अंबड येथील वेअर हाउस येथे होणार असून, मतमोजणी यंत्राचे सील कसे उघडावे, मतमोजणी यंत्रास दोन ठिकाणी कसे सील आहेत, मतमोजणी यंत्राच्या मागे कोेणती खूण कशासाठी आहे, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ते कसे समजून सांगायचे यासह विविध बाबींचे मार्गदर्शन यावेळी भानुदास पालवे यांनी केले. कालिदास कलामंदिरात दोन ठिकाणी स्क्रीनवर यासंदर्भात उपस्थितांना सचित्र माहिती देण्याची सोय करण्यात आली होती. या प्रशिक्षणासाठी जिल्ातील प्रांत, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेले सुमारे बाराशे कर्मचारी व अधिकारी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
दांडी बहाद्दरांची नाही नोंद
या प्रशिक्षणासाठी जरी जिल्हा निवडणूक प्रशासनाने सर्वच्या सर्व कर्मचारी व अधिकार्यांना बोलविले व ते उपस्थित असल्याचा दावा प्रशासन करीत असले तरी प्रत्यक्षात या प्रशिक्षणाला नेमके किती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते किंवा अनुपस्थित किती कर्मचारी व अधिकारी होते, याची माहिती निवडणूक शाखेच्या अधिकार्यांना देता आली नाही. त्यामुळे प्रशिक्षणासंदर्भात मानधन व भत्ते वाटताना ते सरसकट वाटणार काय? हाच खरा कळीचा मुद्दा आहे.