वडगाव पिंगळा शिवारात भरदिवसा बिबट्याचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 00:17 IST2020-06-14T23:38:03+5:302020-06-15T00:17:04+5:30
सिन्नर तालुक्यातील वडगाव पिंगळा शिवारात वनविभागाच्या हद्दीत भरदिवसा बिबट्या वावरताना दिसून आला आहे. डोंगरावरून झाडीत रुबाबदारपणे मार्गक्रमण करणाऱ्या बिबट्याचा एका तरुण उद्योजकाने शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

वडगाव पिंगळा शिवारात भरदिवसा बिबट्याचा वावर
सिन्नर : तालुक्यातील वडगाव पिंगळा शिवारात वनविभागाच्या हद्दीत भरदिवसा बिबट्या वावरताना दिसून आला आहे. डोंगरावरून झाडीत रुबाबदारपणे मार्गक्रमण करणाऱ्या बिबट्याचा एका तरुण उद्योजकाने शूट केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
सिन्नरहून जामगाव घाटाने विंचूरदळवीकडे जाताना दाट झाडीचा परिसर लागतो. या भागात जंगली श्वापदांचा नेहमीच वावर आसतो. पावसाळ्यात धबधबे आणि हिरवाईने नटलेले रान पर्यटकांना खुणावत असते. बिबट्याचेही अधूनमधून दर्शन घडत असल्याचे स्थानिक सांगतात. येथील अरुण सांगळे गुरुवारी मित्रांसमवेत या भागातील खडी क्रशरवर कामानिमित्त गेले होते. दुपारी दीडच्या सुमारास योगायोगाने बिबट्याचे दर्शन घडले. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पुन्हा बिबट्या मुक्त संचार करताना आढळून आला. विंचूरदळवी, पास्ते, जामगाव व वडगाव पिंगळा अशा चार गावांचा शिवार आहे. डोंगराळ भाग असल्यामुळे येथे हा परिसर निर्जन आहे. परिसरातील गावांतून कुत्री अथवा जनावरांची शिकार करायची आणि या जंगलात मुक्काम ठोकायचा असा बिबट्याचा दिनक्रम असल्याचे सांगितले जाते.