इंदिरानगरात बिबट्या
By Admin | Updated: June 30, 2014 01:10 IST2014-06-30T01:09:50+5:302014-06-30T01:10:10+5:30
इंदिरानगरात बिबट्या

इंदिरानगरात बिबट्या
इंदिरानगर : आज सकाळपासून इंदिरानगरात तीनदा बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर येथील प्रथमेश बंगल्याजवळ पुन्हा बिबट्या आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, परिसरातच बिबट्याने आश्रय घेतल्यामुळे नागरिकांची झोप उडाली.
आज सकाळपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडल्याने बिबट्याच्या वास्तव्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहाणी केली असता त्यांना बिबट्याच्या वास्तव्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत. मात्र नागरिकांमधील घबराट कायम आहे.
शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास व रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अनेकांना बिबट्याचे दर्शन घडले होते. रात्री दहा वाजता परिसरात बिबट्या असल्याची चर्चा पसरल्यानंतर सकाळी पुन्हा सात वाजेच्या सुमारास अनेकांना कमोदनगर जवळील पटांगणात बिबट्या पळताना आढळून आला. परिसरात बिबट्याचा शिरकाव झाल्याची वार्ता पसरताच सकाळी नागरिकांनी प्रथमेश बगल्याभोवती बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजन गायकवाड, वनपाल एम. एस. गोसावी व कर्मचाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली. पोलिसांसह कर्मचाऱ्यांनी शास्त्रीनगर परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सकाळी दहा वाजेपर्यंत हा सारा प्रकार सुरू असल्याने बघ्यांची गर्दी वाढत होती.
काही वेळानंतर वनविभाग कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या साथीने परिसरात पाहणी केली असता त्यांना कुठेही बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे परिसरात खरोखरीच बिबट्या आला होता की निव्वळ अफवा होती, अशी चर्चा परिसरात सुरू असतानाच रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याच बंगल्याच्या शेजारी बिबट्याचे पुन्हा दर्शन घडले. यामुळे बिबट्या सकाळपासून याच बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात दडून बसलेला असावा व रात्र होताच बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने नागरिकांची झोप उडाली. वनविभागाचे अधिकारी बिबट्यावर नजर ठेवून असले तरी रात्रीच्या अंधारात बिबट्या दडून बसल्याने इंदिरानगरवासीयांची चिंता वाढली आहे. (वार्ताहर)