शेवगेडांग शिवारात बिबट्याचा वासरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:11 IST2021-07-18T04:11:12+5:302021-07-18T04:11:12+5:30

आहुर्ली : शेवगेडांग शिवारात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने मळयातील घराजवळ असलेल्या गोठ्यावर चाल करत, वासराचा फडशा पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना ...

Leopard attacks calf in Shevgedang Shivara | शेवगेडांग शिवारात बिबट्याचा वासरावर हल्ला

शेवगेडांग शिवारात बिबट्याचा वासरावर हल्ला

आहुर्ली : शेवगेडांग शिवारात शुक्रवारी मध्यरात्री बिबट्याने मळयातील घराजवळ असलेल्या गोठ्यावर चाल करत, वासराचा फडशा पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने वासराच्या हंबरण्याने जागी झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने गोठ्याकडे धाव घेत, वासराचा जीव वाचविला असला, तरी बिबट्याच्या या मुक्तसंचारामुळे परिसरात दहशतीचे सावट पसरले आहे.

शेवगेडांग येथील मोहन बंडू पोरजे यांची मळ्यात वस्ती असून, त्यांच्या मालकीच्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्याची माहिती शेवगेडांगचे उपसरपंच तथा माजी चेअरमन विष्णू पा. पोरजे यांनी कळविली आहे. या हल्ल्यात वासरू जखमी झाले असून, या घटनेनंतर परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

अलीकडच्या काळात ईगतपुरी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रकार वाढले आहेत. पिंपळगाव मोर, टाकेद परिसरात चक्क दोन-तीन लहान बालकांचे बळीही गेलेले आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर या ताज्या घटनांना उजाळा मिळाला असून, बिबट्याच्या या मुक्त संचाराची तातडीने दखल घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी विष्णू पा. पोरजे यांचेसह शेवगेडांगचे सरपंच साहेबराव खंडवी, नथू कुटके, मच्छींद्र पोरजे, शंकर मेदडे, संजय कुटके, आनंदा पोरजे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

-------

Web Title: Leopard attacks calf in Shevgedang Shivara