उंबरदरी धरणातून आवर्तन सोडले
By Admin | Updated: January 12, 2016 22:21 IST2016-01-12T22:20:23+5:302016-01-12T22:21:35+5:30
सिंचनासाठी पाणी : ठाणगाव, पाडळी, टेंभूरवाडीला होणार लाभ

उंबरदरी धरणातून आवर्तन सोडले
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातल्या ठाणगाव येथील उंबरदरी धरणातून शेती सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आले. यामुळे ठाणगावसह टेंभूरवाडी व पाडळी परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
उंबरदरी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत ७ जानेवारीला शेतकरी व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत पाडळी व टेंभूरवाडी येथील शेतकऱ्यांनी तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली, तर ठाणगावकरांनी २० जानेवारीस आवर्तन सोडण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे बैठकीत आवर्तन सोडण्याबाबत एकमत न झाल्याने त्याच दिवशी रात्री उशिरा आमदार राजाभाऊ वाजे यांच्या कार्यालयात तिन्ही गावांतील शेतकऱ्यांची पुन्हा बैठक घेण्यात आली. यावेळी वाजे यांनी शेतकऱ्यांची भूमिका समजावून घेत व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून १२ जानेवारीस पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११ वाजता लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी.एस. जाधव, कालवा निरीक्षक पी.डी. साळुंके, यू.टी. माळोदे, टी. आर. द्याने यांच्यासह ठाणगाव, पाडळी व टेंभूरवाडी येथील शेतकऱ्यांच्या उपस्थित उंबरदरी धरणातून आवर्तन सोडण्यात आले. केवळ एक दिवस आवर्तन सुरू राहणार असल्याने गैरप्रकार रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी धरणावरच तळ ठोकून होते. आवर्तनाचे पाणी म्हाळुंगी नदीपात्राद्वारे पाडळी व टेंभूरवाडी येथील साठवण बंधाऱ्यांमध्ये सोडले जात आहे. रब्बीच्या पिकांसाठी ऐन गरजेच्या वेळी आवर्तन उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गहू, हरभऱ्यासह उन्हाळ कांदा, लसूण आदि पिकांना या आवर्तनाचा लाभ होणार आहे. (वार्ताहर)