पुढाऱ्यांना ‘पापमुक्ती’ची भलतीच घाई
By Admin | Updated: August 29, 2015 23:08 IST2015-08-29T23:08:02+5:302015-08-29T23:08:45+5:30
आखाड्यांपूर्वीच स्नान : भाविकांना ठेवले चार हात लांब

पुढाऱ्यांना ‘पापमुक्ती’ची भलतीच घाई
नाशिक : गोदाघाटावरील रामकुंड परिसरात प्रमुख आखाड्यांचे साधू-महंत यांचे शाहीस्नान होईपावेतो भाविकांना चार हात लांब ठेवणाऱ्या पोलीस प्रशासनाला मात्र आखाड्यांच्या स्नानापूर्वीच पुढाऱ्यांना ‘पापमुक्ती’ची झालेली घाई काही थांबवता आली नाही. रामकुंडात सरतेशेवटी निर्माेही आखाड्याचे स्नान होणे बाकी असतानाच सहकार राज्यमंत्री महापौर यांच्यासह काही पुढाऱ्यांचे भान हरपले आणि त्यांनी गोदापात्रात स्वत:ला झोकून देत मनसोक्तपणे फोटोसेशन करून घेतले. पुढाऱ्यांच्या या चमकोगिरीबद्दल मात्र उपस्थितांनी कठोर शब्दांत टीकास्त्र सोडले.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाहीस्नान हाच विविध आखाड्यांचा केंद्रबिंदू आणि आकर्षणबिंदूही असतो. या शाहीस्नानाचा क्रम आणि वेळा निश्चित करण्यासाठी प्रशासनाला नियोजन करावे लागते. शाहीस्नानाचा क्रम थोडा जरी चुकला अथवा कुणी त्यांच्यात घुसखोरी केली, तर साधू-महंतांचा कोप संपूर्ण प्रशासन हलवून सोडतो. प्रामुख्याने आखाड्यांचे शाहीस्नान होईपर्यंत रामकुंडात अन्य कुणालाही स्नान करू दिले जात नाही. हा नेम प्रत्येक कुंभमेळ्यात पार पाडत आला आहे. परंपरा लक्षात घेऊनच पोलीस प्रशासनाने रामकुंड परिसर चोहोबाजूने बॅरिकेडिंगने व पोलीस बंदोबस्तात सील केला होता. भाविकांना यंदा प्रथमच चार हात लांब य. म. पटांगणावर थोपवून धरण्यात आले होते. रामकुंडात साधू-महंतांच्या स्नानाशिवाय अन्य कुणीही स्नान करू नये, याची दक्षता डोळ्यांत तेल घालून पोलीस प्रशासन करत असताना निर्मोही आखाड्याचे स्नान होण्यापूर्वीच सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महापौर अशोक मुर्तडक, आमदार जयंत जाधव, भाजपाचेच मुंबईतील आमदार राम कदम, मनपा स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनसेचे गटनेते अनिल मटाले, भाजपाचे सुनील बागुल या प्रमुख नेते-पदाधिकाऱ्यांसह काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना गोदापात्रात सूर व डुबकी मारण्याचा मोह आवरता आला नाही. काही कार्यकर्त्यांमध्ये तर आपल्या नेत्याला अंघोळ घालण्याचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी चढाओढ लागली. नेत्यांना डोक्यावर घेत मिरवण्याचाही प्रकार घडला.