नामपूर बाजार समितीच्या उपसभापतीपदी लक्ष्मण पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:11 IST2021-06-17T04:11:21+5:302021-06-17T04:11:21+5:30
सटाणा : तालुक्यातील नामपूर बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटात फूट पडली आहे. सत्ताधारी गटाचे संचालक आमनेसामने लढत लक्ष्मण ...

नामपूर बाजार समितीच्या उपसभापतीपदी लक्ष्मण पवार
सटाणा : तालुक्यातील नामपूर बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटात फूट पडली आहे. सत्ताधारी गटाचे संचालक आमनेसामने लढत लक्ष्मण उत्तम पवार यांनी नऊ मते मिळवून उपसभापतीपद हस्तगत केले. तर भाऊसाहेब कांदळकर यांना सात मतांवर समाधान मानावे लागले.
नामपूर बाजार समितीच्या उपसभापती चारुशीला बोरसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदाच्या निवडणुकीसाठी येथील सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी सत्ताधारी गटाचे लक्ष्मण उत्तम पवार, भाऊसाहेब कांदळकर तर विरोधी गटाचे डी. डी. खैरनार यांच्यात रस्सीखेच होती. सत्ताधारी गटाचे पवार आणि कांदळकर यांच्यात एकमत न झाल्याने सत्ताधारी गटाने पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर कांदळकर यांना उपसभापतीपद नाकारल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकावत उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. निर्धारित वेळेत अर्ज मागे न घेतल्याने रिक्तपदासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या निवडणुकीत लक्ष्मण पवार यांना सोळा पैकी नऊ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. कांदळकर यांना सात मतांवर समाधान मानावे लागले.
पवार या पदावर दुसऱ्यांदा विराजमान झाले असून त्यांची निवड झाल्याने त्यांचा सभापती शांताराम निकम, मावळत्या उपसभापती चारुशीला बोरसे यांनी शाल, नारळ देऊन सत्कार केला. याप्रसंगी संचालक कृष्णा भामरे, भाऊसाहेब अहिरे, संजय भामरे, भाऊसाहेब भामरे आदी उपस्थित होते.
===Photopath===
150621\341515nsk_26_15062021_13.jpg
===Caption===
लक्ष्मण पवार