लासलगाव, नांदगावला वादळी पाऊस

By Admin | Updated: June 6, 2014 23:50 IST2014-06-06T00:02:28+5:302014-06-06T23:50:30+5:30

चार जनावरांचा मृत्यू : कांद्यासह वाहनांचे नुकसान, वृक्ष कोसळले

Lassalgaon, Windy rain in Nandgaon | लासलगाव, नांदगावला वादळी पाऊस

लासलगाव, नांदगावला वादळी पाऊस

लासलगाव : परिसराला गुरुवारी सायंकाळी मॉन्सूनपूर्व पावसाने तडाखा दिला. वादळामुळे सुमारे एक कोटी एक लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जोरदार पावसाने बाजार समितीत आलेल्या कांद्याचेही नुकसान झाले.
शंभर वाहनातील कांद्याचा लिलाव होऊ शकला नाही. कांदा शेडचे पत्रे उडून गेल्यामुळे अतोनात हानी झाली. परिसरातील टाकळी विंचूर, पिंपळगाव नजीक, निमगाव वाकडा, ब्राह्मणगाव, विंचूर भागातील बर्‍याच घरांचे पत्रे उडाले.
लासलगावचे कांदा व्यापारी सुभाष लुणावत, बाळासाहेब दराडे, संदीप जगताप, सोहनलाल भंडारी, संचालाल नंदराम भंडारी, नितीनकुमार जैन, राजेंद्र कासट, कांतीलाल मांगीलाल सुराणा यांचेही अतोनात नुकसान झाले. वादळात अनेक ठिकाणी शेड कोसळल्यामुळे त्याखाली दबून अनेक वाहनांचेही नुकसान झाले.
वादळी पावसाने वीज वाहक तारा मोठ्या प्रमाणावर खाली पडलेल्या आहेत. कोटमागाव रोडवरील मुख्य वाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते.
नांदगाव : बुधवारी सायंकाळी ५ वाजेला पावसासोबत आलेल्या वादळाने साकोरा, पिंपरखेड, गंगाधदी, पोखरी, जातेगाव आदि गावासोबतच नांदगाव शहर व परिसरात प्रचंड वित्तीय हानी केली. ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठाले वृक्ष मुळासकट उन्मळून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली. अनेकांच्या घराचे कौले, पत्रे दूरवर उडाले. काही ठिकाणी भिंती पडल्यात. लोहशिंगवे येथे वीज पडल्याने एक गाय ठार झाली. साकोरा परिसरातल्या सारताळे येथील अंगणवाडीचे छत उडून गेले. तर मराठी शाळेची दुरावस्था झाली.
नांदगावच्या येवला व दहेगाव रोडवरील आडतदार कांदा व्यापार्‍यांचे साठवणुकीचे छतच जमीनदोस्त झाल्याने जवळपास पंधरा हजार क्विंटल कांदा भिजून मोठे नुकसान झाले. एकट्या नांदगाव परिसरातल्या सव्वीस जणांचे मिळून एक कोटी २६ लाख ९0 हजार ७५0 रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनामा गाव तलाठ्याने केला आहे. वीज वितरण विभागाचे जवळपास १३५च्या आसपास खांब मोडून पडल्याने बुधवारपासून खंडीत झालेला वीजपुरवठा आज दुपारपासून काही प्रमाणात सुरळीत झाला. प्रशासकीय संकुलातील तहसील व तालुका पंचायत समिती कार्यालयातील छतावरील शेकडो कौल दूरवर उडून परिसरात कौलांचा खच साचलेला होता.
वादळाने अतोनात नुकसान केल्याने पंचनाम्यांचे काम सुरूच होते. आनंदवाडी भागातील नगरसेविका इंदिरा बनकर यांच्या दारासमोरचे झाड कोसळून त्यांच्या घरावर पडले. रेल्वे कॉलनीत सिमेंटचे पत्रे दूरवर उडालेत. शिवाय वीजेचेखांब मोडून पडले. गंगाधरी गावातील अनिल आहेर, सुदाम सापटे, बाळू इघे आदिंच्या घरावरील पत्रे उडालेत गिरणानगरला अशीच हाती झाली.
जातेगावला पिनाकेश्वर महादेव मंदिराचे छतच हवेत उडून गेले. पोखरी, साकोरा, कुसुमतेल आठ गावातून या चक्रीवादळाचा तडाखा बसला. साकोरा गावात पोल्ट्री फार्म, शाळा इमारती सोबत मळ््यात वस्ती करून राहणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान झाले.
कुसुमतेल येथे शिवाजी मेंगाळ यांच्या घराचे पत्रे उडून त्यांची गाय ठार झाली. हमालवाडा, कैलासनगर भागात झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक नंदू खुरसणे यांनी केली. कांता फोफलिया, रामनिवास कलंत्री, ओमप्रकाश अग्रवाल, भुषण धुम, अमृता कासलीवाल, उमाकांत घोगाणे या आडतदारांच्या कांद्याच्या चाळीचे नुकसान होवून लाखो रुपयांचा कांदा भिजला. (वार्ताहर)

Web Title: Lassalgaon, Windy rain in Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.