लासलगाव बाह्य वळण रस्ता ठरले दिवास्वप्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:10 IST2021-07-05T04:10:38+5:302021-07-05T04:10:38+5:30

भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले होते. यातील पहिल्या टप्प्याचे भूसंपादन दहा वर्षांपूर्वी झाले. दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनाला तीन ते चार ...

Lasalgaon outer turn road became a daydream | लासलगाव बाह्य वळण रस्ता ठरले दिवास्वप्न

लासलगाव बाह्य वळण रस्ता ठरले दिवास्वप्न

भूसंपादनाचे तीन टप्पे करण्यात आले होते. यातील पहिल्या टप्प्याचे भूसंपादन दहा वर्षांपूर्वी झाले. दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनाला तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटला तरी अजूनही त्या शेतकऱ्यांना पूर्ण भरपाई मिळालेली नाही. तिसरा टप्पा तिष्ठत पडला आहे. यानंतर मंजुरी मिळालेल्या शेकडो कि.मी.च्या समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मोबदलादेखील अदा करण्यात आला आहे व काम पूर्णत्वाच्या दिशेने असून लवकरच वाहतुकीस खुला होईल. तर नाशिक-सुरत महामार्गाच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला आहे.

अलीकडेच मंजुरी मिळालेल्या नाशिक पुणे लोहमार्गाचेदेखील शासकीय सोपस्कार पूर्ण होऊन लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार असून त्यांना पाचपट मोबदला देण्याचे सूतोवाच पालकमंत्री भुजबळ यांनी केले आहे. मात्र दस्तुरखुद्द भुजबळ यांच्या मतदारसंघातील अवघ्या चार कि.मी.च्या बाह्य वळण रस्त्याचे काम गेल्या तेरा वर्षांतही पूर्ण न होऊ शकल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. अजूनही किती कालावधी लागेल याची शाश्वती नसल्याने लासलगाव बाह्य वळण रस्ता दिवास्वप्न ठरू पाहत आहे.

लासलगाव येथे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ, म.रा.प. महामंडळाचे आगार, भाभाचे अनुसंशोधन केंद्र तसेच नाफेडचे कांदा खरेदी केंद्र व राज्य शासनाचेे ग्रामीण रुग्णालय आहे. त्यायोगे येथे मोठ्या प्रमाणावर वाहनांची व नागरिकांची वर्दळ असते. परंतु येथे असलेल्या रेल्वे फाटकामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन नेहमीच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघातदेखील झालेले आहेत. रहदारीच्या समस्येने हैराण झालेले लासलगावकर बाह्य वळण रस्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच लासलगावच्या व्यापार उदिमास हातभार लागणार असल्याने व्यावसायिकदेखील बाह्य वळण रस्त्याकडे डोळे लावून बसलेले आहेत.

भूसंपादनाअभावी बऱ्याच शेतकऱ्यांचे वाटप, व्यापार, अंतर्गत रस्ते, खरेदी-विक्री, जमिनी बिनशेती करणे आदी कामेही रखडलेली आहेत. तर संपादित होणाऱ्या जमिनीत गेल्या अडीच ते तीन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने मोजणीचे दगड रोवून ठेवलेले आहेत. त्या शेतकऱ्यांना धड जमीनही कसता येत नाही आणि रस्ताही होत नाही. एकीकडे ही अवस्था तर दुसरीकडे खासदार भारती पवार यांच्या काही महिन्यांच्या प्रयत्नाने लासलगाव टाकळी भुयारी मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे यासाठी येथील लोकप्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी व ग्रामस्थांनी वेळोवेळी भुजबळ यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यांनीदेखील अधिकाऱ्यांना आदेश दिले. परंतु सुस्त यंत्रणेने कधी कोरोना, कधी निवडणूक कधी मोजणी, कधी मूल्यांकन तर कधी शासकीय मंजुरी अशी कारणे देत दुर्लक्ष केल्याने लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे घोंगडे भिजत पडले असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.

040721\20210704_095836.jpg

फोटो कॅपशन

लासलगाव बाह्य वळण रस्त्याचे प्रलंबित असलेले काम

Web Title: Lasalgaon outer turn road became a daydream

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.