लक्ष्मीपूजन
By Admin | Updated: October 23, 2014 00:12 IST2014-10-23T00:11:44+5:302014-10-23T00:12:12+5:30
लक्ष्मीपूजन

लक्ष्मीपूजन
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले अशी कथा आहे. प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी (संध्याकाळी) लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णू इत्यादि देवता आणि कुबेर यांची पूजा, असा लक्ष्मीपूजन या दिवसाचा विधी आहे. यावेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्मी आदि देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादि पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. आश्विन अमावास्येला सूक्ष्म स्वरूपात गतिमान होणारी त्रासदायक स्पंदने जागृत होतात आणि पुन्हा पूर्ण वायुमंडलात गतिमान होण्यास सुरुवात होते. केर काढल्यामुळे घरात शिरलेले त्रासदायक घटक आणि वायुमंडलात गतिमान असणारी त्रासदायक स्पंदने घराच्या बाहेर फेकली जातात. त्यामुळे घराचे पावित्र्यही टिकून राहते. म्हणून आश्विन अमावास्येच्या रात्री अलक्ष्मी नि:सारण म्हणजेच रात्री १२ वाजता घरात केर काढतात. या दिवशी प्रदोषकाळी म्हणजे सायंकाळी ६.०९ ते रात्री ८.३९ या वेळेत लक्ष्मीपूजन करावयास सांगितले आहे. सन्मार्गाने मिळवलेले आणि खर्च होणाऱ्या या दिवशी धनसंपत्तीतील लक्ष्मी अखंड राहो, यासाठी लक्ष्मीपूजन महत्त्वाचे मानले गेले आहे. या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण आहे, पण भारतातून हे ग्रहण दिसणार नसल्याने त्याचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही.