वृद्धाजवळील दोन लाखांची रोकड लंपास
By Admin | Updated: July 5, 2017 01:25 IST2017-07-05T01:24:47+5:302017-07-05T01:25:07+5:30
नाशिकरोड : पायी जाणाऱ्या इसमाच्या हातातील दोन लाखांची रोकड असलेली पिशवी भामट्यांनी चोरून नेली.

वृद्धाजवळील दोन लाखांची रोकड लंपास
नाशिकरोड : बिटको महाविद्यालय येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र येथून पायी जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाच्या हातातील दोन लाखांची रोकड असलेली कापडी पिशवी मोटारसायकलवर आलेल्या दोघा भामट्यांनी ओढून चोरून नेली. शिखरेवाडीतील हरीओम सोसायटीत राहणारे महेंद्र यशवंत बानोडकर (६५) हे सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कामानिमित्त बिटको महाविद्यालय येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र येथून रस्त्याने पायी जात होते. पाठीमागून मोटारसायकलवर आलेल्या दोघा भामट्या युवकांपैकी पाठीमागे बसलेल्या युवकाने त्यांच्या हातातील हिसकावून नेली.
आधार-सीमकार्ड लिंक; गोडसे यांची मागणी
नाशिक : गुन्हे शोधण्यासाठी आणि नियंत्रणासाठी आधार आणि मोबाइल सीमकार्ड परस्परांशी लिंक करण्याची मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान समितीकडे केली. देशाच्या डिजिटल धोरणांबाबत २९ जूनला माहिती तंत्रज्ञान विभागाची बैठक झाली. बैठकीस समितीचे अध्यक्ष अनुराग ठाकूर, लालकृष्ण अडवानी, करूणाकरन, रावसाहेब दानवे, विनय सहस्त्रबुद्धे, रामदास तडस आदी खासदार उपस्थित होते.
उद्योजक शिबिरातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
नाशिक : भारत सरकारच्या राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या अहमदाबाद येथील भारतीय उद्योजक विकास संस्था आणि मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र यांनी संयुक्तरीत्या मातोश्री महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित केलेल्या तीनदिवसीय उद्योजक जागरूकता शिबिराला सुरुवात झाली आहे.
कत्तलखाना
स्थलांतराची मागणी
नाशिक : जुन्या नाशकातील महात्मा फुले मंडईतील कत्तलखाना वडाळा परिसरात स्थलांतरित करण्याची मागणी आमदार देवयानी फरांदे यांनी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे केली आहे. आमदार देवयानी फरांदे यांनी सोमवारी (दि.३) आयुक्तांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा केली. त्यात महात्मा फुले मंडईतील अनेक वर्षांपासून असलेला कत्तलखाना अन्यत्र स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी वडाळा परिसरातील जागेचाही प्रस्ताव त्यांनी सुचविला.
सुरक्षारक्षकाची नोंदणी करण्याच्या सूचना
नाशिक : अनोंदीत सुरक्षारक्षक व त्यांना तैनात करणाऱ्या कारखान्यांच्या मालकांची जिल्हा सुरक्षारक्षक मंडळात नोंदणी करण्याच्या सूचना कामगार उपआयुक्तकार्यालयाने केली असून, जे नोंदणी करणार नाहीत अशांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात राज्याच्या कामगारमंत्र्यांकडे राज्य सुरक्षारक्षक सल्लागार समितीची बैठक घेण्यात येऊन त्यात अनोंदीत सुरक्षारक्षक व त्यांना तैनात करणारे आस्थापना व कारखाने यांच्या मुख्य मालकांची नोंदणी मंडळात करावी, असे ठरविण्यात आले.