अवयवदानाविषयी व्यापक जनजागृतीचा अभाव
By Admin | Updated: August 12, 2016 23:08 IST2016-08-12T23:07:38+5:302016-08-12T23:08:06+5:30
खर्चिक प्रक्रिया : याचक अधिक तर दात्यांची कमतरता

अवयवदानाविषयी व्यापक जनजागृतीचा अभाव
भाग्यश्री मुळे नाशिक
अवयवदानाच्या बाबतीत याचकांची मोठी प्रतीक्षा यादी व त्या तुलनेत दात्यांची संख्या कमी असे व्यस्त प्रमाण महाराष्ट्रासह नाशिकमध्येही पहायला मिळत असून आपल्या मृत्यूपश्चात नेत्र, त्वचा, किडनी, हृदय आदि अवयव दान करून वेदनामय जीवन जगणाऱ्या व्यक्तींना जीवदान देणारी अवयवदान मोहीम व्यापक होण्याची गरज दिसून येत आहे.
रस्ते अपघात, घरगुती अपघात आदि विविध घटनांमुळे अपघात होऊन मेंदूमृत झालेल्या व्यक्तींच्या शरीरातील अवयवांचे गरजू रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्याची ही प्रक्रिया खर्चिक असल्यानेही आर्थिक स्थिती भक्कम असणाऱ्यांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येत असल्याचेही समोर आले आहे.
अवयवदानाविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज असून ते दूर करण्याची नितांत गरज आहे. मृत्यूनंतर डोळे, त्वचा हे अवयव दान केले तर मृत व्यक्ती विद्रुप दिसते, पुढच्या जन्मी त्या व्यक्तीला ते अवयव देव देत नाही, अवयवदान व देहदान हे एकच आहे, अवयवदान हे मृत्यूनंतरच करता येते, जिवंतपणी अवयवदान केले तर आयुष्य कमी होते, दात्याला अपंगत्व येते, मेहनतीची कामे करता येत नाही अशा अनेक गैरसमजुती लोकांमध्ये असून त्यांचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यापक जनजागृती करणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावेंसह ७ कार्यकर्ते, डॉ. भाऊसाहेब मोरे, आयएमए सारख्या संस्था अवयवदानाविषयी जनजागृतीचे काम करत असून प्रत्येकाने आजवर १५ ते २० जणांना अवयवदानासाठी तयार केले आहे. काही अपघात झाल्यास वा काही घटना घडल्यास व माझा मेंदू मृत झाल्यास माझे अवयव काढून घेऊन ते गरजूंना द्यावेत, अशा परवानगीचे कार्ड या व्यक्ती आपल्या खिशात बाळगत आहेत. याशिवाय या व्यक्तींची माहिती प्रत्यारोपणाची प्रक्रिया राबवणाऱ्या झेडटीसीसी या संस्थेलाही दिली जात आहे. आजच्या घडीला नाशिकसह महाराष्ट्रात हजारो रुग्ण किडनी, हृदय, त्वचा, डोळे आदि अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. ब्रेनडेड रुग्णांचे अवयव काढून घेण्यासाठी नॉन ट्रान्सप्लांट सेंटरची संख्या वाढणे गरजेचे आहे. ब्रेनडेड झालेल्या व्यक्तींबद्दलची माहिती शासनाला कळविण्याचे प्रमाण अत्यंत कमी असून या मोहिमेत अडथळा येत आहे.