साहित्य संमेलन स्थळ होणार कुसुमाग्रज नगरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:45 IST2021-02-05T05:45:37+5:302021-02-05T05:45:37+5:30
नाशिक : गोएसोच्या कॅम्पसमध्ये २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या स्थळाचे कुसुमाग्रज नगरी असे नामकरण करण्याचा निर्णय संमेलनाच्या ...

साहित्य संमेलन स्थळ होणार कुसुमाग्रज नगरी !
नाशिक : गोएसोच्या कॅम्पसमध्ये २६ ते २८ मार्चदरम्यान होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या स्थळाचे कुसुमाग्रज नगरी असे नामकरण करण्याचा निर्णय संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित नाशिककर नागरिकांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. या निर्णयाची घोषणा करतानाच नाशिकला होणारे संमेलन चिरसंस्मरणीय व्हावे, यासाठी आपण सर्व नाशिककर मिळून प्रयत्नांची पराकाष्टा करू, असे नाशिकचे पालकमंत्री आणि साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सांस्कृतिक, सामाजिक संस्थांच्या सूचना ऐकून घेतल्यानंतर स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी सर्वसंमतीने कुसुमाग्रज नगरीचा निर्णय जाहीर केला. यावेळी बोलताना भुजबळ यांनी संमेलनात राजकारणी म्हणून स्टेज व्यापण्यासाठी नव्हे तर नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्यासाठी सहभागी होणार असल्याचे सांगितले. संमेलनासाठी अनेकोनेक सूचनांचा पाऊस पडला असला तरी कोणते कार्यक्रम अंतर्भूत करायचे, त्याबाबतचा निर्णय आयोजक संस्था आणि साहित्य महामंडळाने घ्यावा. आम्ही केवळ जे साहित्यिक, रसिक येतील, त्यांची चांगली व्यवस्था ठेवण्याचे कार्य करू. संंमेलनासाठी ५० दिवस बाकी आहेत, असे गृहीत धरून वाहतुकीपासून मंडप उभारणीपर्यंत आणि पुस्तक प्रदर्शनापासून खानपान व्यवस्थेपर्यंत सर्व सुविधा विविध समित्यांच्या माध्यमातून सज्ज करण्यात याव्यात. जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या समन्वयक अधिकाऱ्यांपासून प्रत्येक विभागाचा एक अधिकारी संमेलनाच्या समन्वय समितीत राहून त्वरित कार्यरत होण्याची व्यवस्था करण्याचे आदेशदेखील भुजबळ यांनी दिले. संमेलनाला अजून कालावधी असला तरी कोरोना गेलेला नसल्याने त्यासंदर्भातील प्रत्येक व्यवस्थादेखील सज्ज करण्याचे निर्देश भुजबळ यांनी दिले. संमेलनासाठी काही सूचना असतील तर त्या माझ्यापर्यंत, आयोजकांपर्यंत पोहोचवाव्यात. मात्र, वादविवाद होऊन वातावरण कलूषित होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक असल्याचेही भुजबळ यांंनी सांगितले. आम्ही सर्व राजकारणीही पक्षभेद विसरून एकदिलाने संमेलनाच्या पाठिशी उभे राहू, असेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनीही संमेलनाला शुभेच्छा दिल्या.
इन्फो
गुढ्या उभारून स्वागत करू
नाशिकच्या साहित्य संमेलनाला वैज्ञानिक आणि साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखे साहित्यिक लाभले असून, हे संमेलन निश्चितपणे साहित्यिक आणि जनतेच्या प्रदीर्घ काळ लक्षात राहणारे ठरेल, असे संमेलन भरवण्याचा विश्वासदेखील आहे. संमेलनासाठी राज्यातून येणाऱ्या साहित्यिकांचे आम्ही निश्चितपणे यथोचित स्वागत करू, त्याचप्रमाणे नागरिकांनी साहित्यिकांना आणि बाहेरगावाहून येणाऱ्या रसिकांचे स्वागत करण्यासाठी संमेलनकाळात घरोघरी गुढ्या उभाराव्यात. त्यामुळे वातावरणनिर्मिती होण्यासह सर्व साहित्यिक, रसिकांनाही नाशिकचे साहित्य संमेलन संस्मरणीय होईल, असेही भुजबळ यांनी नमूद केले.
इन्फो
कुसुमाग्रज या कॉलेजचे विद्यार्थी
संमेलनाचे उपाध्यक्ष डॉ. मो. स. गोसावी सर यांनी कुसुमाग्रज हे १९२७ ते १९३१ अशी चार वर्षे या कॉलेजचे विद्यार्थी होते, त्यामुळे त्यांचे नाव या परिसराला देणे ही अत्यंत आनंददायी बाब असल्याचे सांगितले. विज्ञानवादी साहित्यिक संमेलनाचा अध्यक्ष असल्याने या संमेलनातून समाजात विज्ञान वृत्ती जोपासली जावी आणि हीच त्या संमेलनाची फलश्रुती ठरावी, असेही डॉ. गोसावी यांनी सांगितले.