त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांकडेही आढळल्या कुणबी मराठा नोंदी; मनोज जरांगेंनी केलं अवलोकन
By धनंजय वाखारे | Updated: November 22, 2023 17:16 IST2023-11-22T17:15:03+5:302023-11-22T17:16:40+5:30
मनोज जरांगे-पाटील यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पुरोहितांकडे असलेल्या वंशावळीतील नोंदीही बघितल्या.

त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांकडेही आढळल्या कुणबी मराठा नोंदी; मनोज जरांगेंनी केलं अवलोकन
वसंत तिवडे, त्र्यंबकेश्वर (नाशिक) : मराठा आरक्षणासाठी राज्यव्यापी दौऱ्यावर निघालेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी (दि. २२) भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. दरम्यान, त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांकडे असलेल्या वंशावळीतील कुणबी मराठा असलेल्या यात्रेकरूंच्या नोंदीही बघितल्या.
मनोज जरांगे-पाटील यांचे मंगळवारी (दि. २१) रात्री १० वाजता त्र्यंबकेश्वरला आगमन झाले. यावेळी डीजेच्या तालावर त्यांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान प्रचंड रेटारेटी झाल्याने समाजबांधव आप्पासाहेब कुढेकर यांच्या डाव्या पायावरून गाडीचे चाक गेल्याने ते जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ. भागवत लोंढे यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिकला हलविण्यात आले.
दरम्यान, बुधवारी (दि. २२) जरांगे-पाटील यांनी भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर पुरोहितांकडे असलेल्या वंशावळीतील नोंदी बघितल्या. पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, गिरीश जोशी, चेतन ढेरगे यांच्याबरोबर त्यांनी नोंदींबाबत चर्चा केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशपरंपरागत तीर्थोपाध्ये चेतन ढेरगे यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद होती. योगायोगाने त्यांच्याकडेच मनोज जरांगे-पाटील यांच्या पूर्वजांची नोंद असल्याचे व लवकरच ती शोधून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.