कुंभपर्व काळात नाशिकमध्ये मालमोटारींना ‘नो एंट्री’
By Admin | Updated: July 23, 2015 00:42 IST2015-07-23T00:36:49+5:302015-07-23T00:42:00+5:30
वाहतूक अन्य मार्गाने वळविणार : एक्सप्रेस वे, औरंगाबाद, जळगाव मार्गे फेरा

कुंभपर्व काळात नाशिकमध्ये मालमोटारींना ‘नो एंट्री’
नाशिक : कुंभमेळ्यात होणाऱ्या पर्वणीच्या दिवशी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता नाशिकमधून जाणारा राष्ट्रीय महामार्ग विभाग तीन बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पर्वणीच्या दिवसात कोणत्याही मालमोटारी नाशिक जिल्ह्यात प्रवेश करू शकणार नाही. त्याऐवजी ही वाहतूक मुंबई पुणे एक्सप्रेस वे, औरंगाबाद, जळगाव, धुळे मार्गे पुढे इंदोर-सुरतकडे नेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार पोलीस खात्याकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
नाशिकमध्ये कुंभमेळा भरत असताना आजवर कधी नव्हे इतके काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. पर्वणीच्या दिवशी नाशिक शहरात आणि त्र्यंबकेश्वर मिळून किमान ७० ते ८० लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे नाशिक शहरात भाविकांची वाहने वगळता अन्य वाहनेच येऊ नयेत अशा प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन हा नाशिक जिल्ह्यातून जातो. त्यामुळे मालट्रक आणि अन्य अवजड वाहतूक नाशिकमार्गेच होत असते. परंतु आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन बंद ठेवण्यात येणार आहे. साहजिकच नाशिक मार्गे सुरत-इंदोरकडे जाणारी मालवाहतूक ही अन्य मार्गावरून वळवावी लागली आहे. मालवाहतुकीची मुंबईतून सुरुवात होईल आणि गुजरातकडे जाणारी वाहतूक ही औरंगाबाद मार्गे जाणार आहे.
नाशिकमध्ये २९ आॅगस्ट, १३ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर तसेच त्र्यंबकेश्वर येथील २५ सप्टेंबर अशा एकूण दोन सामाईक आणि दोन स्वतंत्र पर्वणी कालाचा विचार करून प्रत्येक पर्वणीच्या आदल्या दिवशी, पर्वणीच्या दिवशी आणि पर्वणीच्या दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे तीन दिवस आणि चार पर्वण्यांचा विचार करता १२ दिवस नाशिक मार्गे वाहतूक बंद राहणार आहे. (प्रतिनिधी)