कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा : चिदानंद सरस्वती
By Admin | Updated: September 23, 2015 23:54 IST2015-09-23T23:54:05+5:302015-09-23T23:54:22+5:30
मुख्यमंत्री फडणवीस यांना केल्या सूचना

कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा : चिदानंद सरस्वती
नाशिक : येथे पार पडलेल्या कुंभमेळ्यात स्वच्छता चांगली राखल्याबद्दल शासकीय यंत्रणांचे कौतुक करताना कुंभमेळा पर्यावरणपूरक व्हावा यासाठी परमार्थ निकेतनचे अध्यक्ष स्वामी चिदानंद सरस्वती महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध स्थायी योजना सुचवल्या आहेत.
स्वामी चिदानंद सरस्वती हे ग्लोबल इंटरफेथ वॉश एलायंस म्हणजेच जीवाचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष असून त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे स्वच्छता कुंभ म्हणून पर्यावरणपूरक परिषदेचे आयोजनही केले आहे. त्यांनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि हरित कुंभ करण्यासाठी विविध योजना सुचविल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात केलेल्या स्वच्छता कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनदेखील उपस्थित होते. जितके साधू तितके वृक्ष या संकल्पनेचा स्वीकार करावा, त्यासाठी संत समाजाला सहभागी करून घ्यावे अशा सूचना त्यांनी केल्या. सर्व संतांच्या आश्रमात वृक्षारोपण करावे, असे आवाहनही त्यांनी केले. संत आणि वृक्ष परोपकारी असून ते समाजाच्या कल्याणासाठी असल्याचे मत स्वामींनी व्यक्त केले आणि मराठवाड्यात भविष्यात दुष्काळ पडू नये यासाठी विविध उपाय त्यांनी सांगितले.