कुंभमेळा : भाविकांच्या पाठ फिरवणीवर महसूल खाते नाराज
By Admin | Updated: September 1, 2015 00:02 IST2015-08-31T23:44:31+5:302015-09-01T00:02:38+5:30
अधिकाऱ्यांकडून आढावा, चिकित्सा

कुंभमेळा : भाविकांच्या पाठ फिरवणीवर महसूल खाते नाराज
नाशिक : वर्ष, दीड वर्षापासून केलेले नियोजन, दिवसभर चालणाऱ्या बैठका व साठ तासांपेक्षाही अधिक काळ प्रत्यक्ष फिल्डवर्क करूनही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पहिल्या पर्वणीकडे भाविकांनी पाठ फिरविल्याची सर्वाधिक खंत महसूल खात्याचे अधिकारी व्यक्त करू लागले असून, सोमवारी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी निवडक अधिकाऱ्यांकडून त्यामागचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला, तर विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत येत्या एक-दोन दिवसांत सर्व यंत्रणांची बैठक घेण्यापूर्वी प्रत्येक अधिकाऱ्याने या कारणांची चिकित्सा करून बैठकीत त्याचा ऊहापोह करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात सर्वाधिक महत्त्व पर्वणीच्या दिवसाला असून, त्या अनुषंगाने सर्व तयारी केली जाते. नाशिक व त्र्यंबकेश्वरच्या पर्वणीसाठी करण्यात आलेली अति तयारीच पोलीस-प्रशासनाच्या अंगलट येऊन भाविकांनी सारे नियोजन फोल ठरविले. ८० लाख ते कोटी इतके भाविक येण्याची शक्यता गृहीत धरण्यात आलेली असताना प्रत्यक्ष लाखावरच भाविकांनी हजेरी लावली. भाविकांच्या रोडावलेल्या संख्येची कारणमीमांसा करताना पोलीस यंत्रणेवरच त्याचे खापर फोडले जात असून, महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनीही खासगीत ते मान्य केले आहे.
तसेच विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनीही कुंभमेळ्याच्या कामात प्रत्यक्ष फिल्डवर असलेल्या अधिकाऱ्यांना आलेला अनुभव, नियोजनाबाबतच्या त्रुटी व आणखी काय करता येईल, याची चिकित्सा करण्याचे आदेश दिले. येत्या एक-दोन दिवसांत यासंदर्भात बैठक होण्याची शक्यता असून, या बैठकीतच पर्वणीचे नियोजन व भाविकांसाठी अधिकाधिक सुविधा देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. (प्रतिनिधी)