मालेगाव मनपा आयुक्तांची आदेशावरून कोलांटउडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 01:02 IST2020-07-21T21:20:06+5:302020-07-22T01:02:36+5:30

मालेगाव मध्य : जिल्हा बंदीचे उल्लंघन करीत शहरातील कोवीड सेंटरमध्ये उपचार केल्याप्रकरणी जिल्हा बाह्य व ग्रामीण भागातील रूग्णांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशामुळे जनतेत पसरलेला रोष व महागठबंधन आघाडीने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांना आपले आदेश मागे घ्यावे लागले.

Kolantudi by order of Malegaon Municipal Commissioner | मालेगाव मनपा आयुक्तांची आदेशावरून कोलांटउडी

मालेगाव मनपा आयुक्तांची आदेशावरून कोलांटउडी

मालेगाव मध्य : जिल्हा बंदीचे उल्लंघन करीत शहरातील कोवीड सेंटरमध्ये उपचार केल्याप्रकरणी जिल्हा बाह्य व ग्रामीण भागातील रूग्णांवर गुन्हे दाखल करण्याच्या आदेशामुळे जनतेत पसरलेला रोष व महागठबंधन आघाडीने घेतलेल्या आक्रमक पावित्र्यामुळे मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांना आपले आदेश मागे घ्यावे लागले.
शहरातील फारान हॉस्पिटलमधील कोवीड सेंटरमध्ये संगमनेर, धुळे, येवला व तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्णांनी उपचार घेतले होते. याप्रकरणी कुठल्याही प्राधिकृत अधिकाऱ्याची परवानगी न घेता जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘त्या’ रूग्णांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधी मनपाचे डीसीएचसी केंद्र प्रमुख डॉ. ए. ए. फैजी यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तसे पत्रच मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी ११ जुलै रोजी काढून संबंधित रूग्णांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते.
आयुक्तांच्या या अजब फतव्यामुळे शहरासह जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. याची दखल घेत आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल यांच्यासह महागठबंधन आघाडीने आयुक्तांच्या आदेशाचा निषेध करीत आदेश मागे घेवून जनतेची जाहीर माफी मागावी असा आक्रमक पवित्रा घेतला होता.
त्यामुळे आयुक्तांनी सोमवारी (दि. २०) एक पत्र काढले असून त्यात जिल्हाबंदी काळात मनपा क्षेत्रात येवून फारान हॉस्पिटल या कोवीड केंद्रामध्ये उपचार करणाºया रूग्णांवर उचित कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन स्वत: सक्षम असल्याने मागील आदेश रद्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आयुक्त कासार यांनी आपल्या ‘त्या’ आदेशावरुन कोलांटउडी घेत कारवाईचा चेंडू पोलीस प्रशासनाकडे टोलावला आहे. यासंदर्भात पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे महागठबंधन आघाडीसह शहरवासियांचे लक्ष लागून आहे.
------------------
माफीची मागणी
महागठबंधन आघाडीचे नगरसेवक एजाज बेग, मुस्तकीम डिग्निटी, मौलाना अतहर हुसैन अशरफी यांनी आयुक्त त्र्यंबक कासार यांची भेट घेतली. यावेळी जनतेची जाहीर माफी मागावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. यावर आयुक्त व उपस्थितांमध्ये शाब्दीक चकमकही उडाली. तथापि दोन दिवसात आपल्या निवेदनाचे लेखी स्वरूपात उत्तर देण्याचे आयुक्तांनी आश्वासन दिल्याने अजून दोन दिवस वाट पाहण्याची भूमिका महागठबंधनने घेतल्याची माहिती नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी यांनी दिली.
-------------
फारान हॉस्पिटलसह इतर कोवीड केंद्रामध्ये एकूण १२० मनपा क्षेत्राबाहेरील रूग्णांवर उपचार करण्यात आले आहे. त्यापैकी फारान हॉस्पिटल वगळता सर्व केंद्र प्रमुखांनी त्याबाबतची माहिती मनपा आयुक्तांना दिली होती. परंतु फारान रूग्णालयाचे प्रमुख डॉ. ए. ए. फैजी कडून या रूग्णांची माहिती मनपा देण्यात आली नाही.
- नितीन कापडणीस, मनपा उपायुक्त

Web Title: Kolantudi by order of Malegaon Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक